सत्ता गेल्याने संजोग वाघेरे यांची दुकानदारी कायमची बंद

0

पिंपरी-चिंचवड : सलग 15 वर्षे सत्ता होती, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने समाविष्ट गावांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. मात्र, भाजपने सत्ता मिळताच दहाव्या महिन्यांत या गावांमध्ये विकासाची गंगा पोचविण्याचा निर्णय घेतला. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना पोटशूळ उठले आहे. समाविष्ट गावांतील विकासासाठी 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना आमच्याकडून गडबड झाली असेल, तर वाघेरे यांनी त्याचे पुरावे द्यावेत. मग भाजप दोषींना अजिबात पाठीशी घालणार नाही. मात्र, आपली दुकानदारी कायमची बंद झाली म्हणून त्यांनी उगाच बोंबाबोंब करू नये, अशा शब्दांत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाघेरे यांचा समाचार घेतला आहे.

वाघेरे यांचे ‘वेगळेच’ दुखणे बाहेर
जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना पवनाथडी जत्रेवर माझे ऐकून खर्च केला जात होता, असे विधान वाघेरे यांनी केले आहे. प्रत्यक्षात आपण पवनाथडीच्या नियोजनात कधीही हस्तक्षेप केलेला नाही. सांगवीत मोठी जागा उपलब्ध असल्याने याठिकाणी आयोजन करावे, यासाठी आपण नेहमीच आग्रही होतो. त्यामुळे विरोधी पक्षात असणार्‍या माझ्यासारख्या आमदाराचे ऐकून पवनाथडी जत्रेवर खर्च करत होतो, असे म्हणणार्‍या वाघेरे यांची कीव करावीशी वाटते. पवनाथडीवर अनावश्यक खर्च करण्याचे टाळून भाजपने करदात्यांचे पैसे वाचविले. त्याचा आनंद होण्याऐवजी वाघेरे यांचे वेगळेच दुखणे बाहेर आले आहे. त्यांचे कलावंतीणीवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. साहजिकच खर्चात कपात झाल्याने त्यांच्या भावना दुखावणे साहजिकच आहे.

राष्ट्रवादीने साधे रस्तेही केले नाहीत
वाघेरे यांनी शहरातील जनतेवरही कलावंतीणीएवढेच प्रेम केले असते, तर कदाचित महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळविता आले असते. परंतु, राष्ट्रवादीचे बेगडी प्रेम ओळखलेल्या जनतेने निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली आहे. महापालिकेतील सत्ता बदलानंतर त्यांची दुकानदारी कायमची बंद झाली आहे. त्यामुळेच ते समाविष्ट गावांच्या विकासाकडेही दुकानदारीच्याच नजरेने पाहत आहेत. महापालिकेत समावेश झालेल्या गावांना राष्ट्रवादीने गेल्या दहा-बारा वर्षांत विकासांपासून जाणूनबूजून वंचित ठेवले. महापालिकेचे वार्षिक अर्थसंकल्प हजारो कोटींच्या घरात असताना राष्ट्रवादीला समाविष्ट गावांमध्ये साधे रस्ते सुद्धा करता आले नाहीत. या गावांमध्ये इतर सेवासुविधांची, तर बोंबाबोंबच आहे. मात्र भाजपने समाविष्ट गावांमध्ये विकासाची गंगा पोचविण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यातील समाविष्ट गावांतील रस्ते आणि आरक्षणांचा विकास करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून दाखवावाच
आजपर्यंत या गावांकडे केवळ व्होटबँक म्हणून पाहणार्‍या राष्ट्रवादीला समाविष्ट गावांमध्ये आगामी काळात होणारी विकासकामे पाहून पोटशूळ उठले आहे. महापालिकेतील आपली दुकानदारी कायमची बंद झाली म्हणून विनाकारण बोंबाबोंब मारणार्‍या वाघेरे यांनी समाविष्ट गावांतील विकासांसाठी 425 कोटींच्या खर्चाला मंजुरी देताना त्यात गडबड झाली असल्यास त्याचे पुरावे द्यावेत. भाजप दोषींना अजिबात पाठीशी घालणार नाही. विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीतील अनियमिततेबाबत भाजपनेच पुरावे दिले होते. त्यामुळे अधिकार्‍यांना त्याची शिक्षा सुद्धा झाली. त्यामुळे वाघेरे यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी या प्रकरणात भाजप पदाधिकार्‍यांविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून दाखवावाच, असे आव्हान त्यांनी दिले आहे.