सत्तेतील कारभा-यांचा विरोध कायम

0

महापालिकेत समावेशाविषयी संभ्रमावस्था

वाकड : हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला आहे. ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा वस्थापन या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. महापालिकेची नियमावली, मिळकतकर आकारणी, वाढती पाणीपट्टी या विषयीची भीती ग्रामस्थांना असल्याने समावेशाविषयी त्यांची संभ्रमावस्था आहे. एका बाजूला भव्य-दिव्य, पंचतारांकित कंपन्यांचा झगमगाट असा आयटी पार्क आणि दुसर्‍या बाजूला सर्वत्र अनधिकृत बांधकामांनी वेढल्याने गावाला आलेले बकालपण अशी सद्य:स्थिती हिंजवडीची आहे.

युती सरकारच्या काळात 1995 ला हिंजवडी परिसरात आयटी पार्क वसविण्याची घोषणा झाली. मात्र या आयटी पार्कला 1999-2000 मध्ये चालना मिळाली. गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे हिंजवडीचा पालिका हद्दीत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल. आयटी पार्कचा विस्तार झाल्यानंतर देशाच्या कानाकोपर्‍यातून रोजगारासाठी लोक येथे दाखल झाले आहेत. हिंजवडी गावाची मागील जनगणनेनुसार 11,459 लोकसंख्या आहे. प्रत्यक्षात 50 हजारांहून अधिक येथील लोकसंख्या आहे.

समावेशाबद्दल नकारात्मकता
हिंजवडीच्या माजी सरपंच रोहिणी साखरे म्हणाल्या की, गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यास सुविधा होतील. हे जरी खरे असले, तरी आमची ग्रामपंचायत देखील नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम आहे. यापुर्वी समाविष्ट केलेल्या गावांचा महापालिकेने विकास साधला नाही. त्यामुळे नागरिकांत नकारात्मकता आहे. महापालिका हद्दीत समावेश करण्याऐवजी हिंजवडी-माण व अन्य गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेची स्थापना करावी. माजी सरपंच शाम हुलावळे म्हणाले की, वस्तुस्थिती नाकारता येत नाही. विकास होण्यासाठी महापालिकेची आवश्यकताच आहे. त्यामुळे महापालिकेने ही गावे समाविष्ट करावीत. मात्र गाव समाविष्ट करून विकास आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करता येत नसेल, तर पाच गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेला मान्यता द्यावी. जेणेकरून स्वतंत्ररित्या राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने सर्वांगीण विकास साधता येईल.