भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये विघानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश राज्यात सत्ता आल्यास संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून दिले आहे. काँग्रेसच्या या घोषणेबाबत राज्यातील सत्ताधारी भाजपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मंदिर नही बनने देंगे, शाखा नही लगने देंगे हेच सध्या काँग्रेसचे धोरण आहे, असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा काल शनिवारी प्रसिद्ध केला. या वचनपत्रामधूम हिंदू मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी सौम्य हिंदुत्वाचा नारा देण्यात आला आहे. मात्र राज्यात सत्ता आल्यावर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे. सत्ता आल्यावर राज्यातील सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.