भुसावळ : भुसावळ पालिकेत भाजपाची सत्ता असून आम्ही सत्ताधारी असलो तरी आमच्याच प्रभागात कामे होत नसल्याने अशा सत्तेचा काय उपयोग? असा संतप्त सवाल भुसावळ भाजपाचे सत्ताधारी नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर यांनी उपस्थित करून सत्ताधार्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठाकूर हे प्रभागातील गटारींच्या स्वच्छतेसंदर्भात पाठपुरावा करीत आहेत मात्र त्याची दखल ना पालिका प्रशासनाने घेतली नाही ना नगराध्यक्षांनी, अशी खंत ठाकूर यांनी व्यक्त केली. नागरीकांनी मोठ्या विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्याने नैतीक जवाबदारी म्हणून नाईलाजाने आता प्रभागात गटारींची स्वच्छता सुरू केली असल्याची माहितीही ठाकूर यांनी देत नेहमी-नेहमी पदरमोड करायची तरी किती? अंतर्मुख करणारा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दोन वर्षानंतरही तक्रारींची दखल घेत नाही
प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपाचे सत्ताधारी नगरसेवक पिंटू ठाकूर हे निवडून आले आहेत शिवाय उपक्रमशील नगरसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप असो की प्रभागातील नागरीकांच्या आरोग्यासाठी निर्जंतुकीकरणाचा विषय असो ठाकूर हे अग्रभागीच राहिले आहेत शिवाय प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पदरमोड केली आहे त्यामुळे प्रभागातील नागरीकांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
सत्ताधार्यांकडून तक्रारींना टोपली
नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 20 मधील आदर्श नगर, न्यू हुडको कॉलनी, मिरची ग्राऊंड तसेच म्हाडा कॉलनी परीसरात गटारी तुंबल्याने सुमारे दोन वर्षांपासून नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती, पालिकेचे आरोग्य अधिकार्यांकडे तक्रारींचा पाढा वाचला, निवेदने दिली मात्र आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही व प्रत्यक्षात काम झाले नसल्याने नागरीकांची नाराजी वाढत गेल्याने स्वखर्चाने आता प्रभागात गटारींची स्वच्छता करण्याची वेळ आली. नागरीकांनी निवडून दिल्याने त्यांच्या समस्या सोडवणे हे कर्तव्य असलेतरी स्वखर्चातून किती कामे करायची? असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित करीत आम्ही सत्तेतही असूनही कामे होत नसल्यास ही सत्ता काय कामाची? असा संतापजनक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.