सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणार्‍या गावांना करणार शासकीय मदत

0

बारामती । पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप-2018 स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व गावांनी सहभागी व्हावे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावातील जलसंधारण व पाणलोट विकासाची कामे होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्‍या गावांना शासकीय स्तरावर सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2018 मध्ये सहभागी होण्याविषयीची सभा बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, भरत खैरे, सुनंदा पवार, तहसिलदार हनुमंत पाटील, प्रमोद काळे, आबा लाड, पृथ्वीराज लाड आदींसह तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, कृषी व जलसंधारण विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

जागृत व्हा
भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आपण जागृत झाले पाहिजे. यापुढे टँकरची मागणी करणारे प्रस्ताव येताच त्या गावात किती शासकीय योजना राबविल्या गेल्या. स्पर्धेत सहभाग घेतला होता की नाही याबाबतची माहिती घेण्यात येणार असल्याचे निकम यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा
तालुक्यात जलसंधारण, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. यासाठी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांची मदत झाली आहे, असे निकम यांनी पुढे सांगितले. अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा ठरणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त गावांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गावातला एकोपा जपा
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत बारामती तालुक्याचा राज्यात पहिला नंबर आला पाहिजे. स्पर्धेतील सहभागामुळे गावातील एकोपा जपला जातो. शेती व पाण्याची गरज भागून शेतीच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे सुनंदा पवार यांनी सांगितले. पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांनी स्पर्धेविषयी प्रवेश अर्ज, नियम व गुणांकन पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली. फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातील गावात करण्यात आलेल्या कामांची चित्रफीत दाखविण्यात आली.