धुळे । 1जुनपासुन महाराष्ट्रातल्या विविध शेतकरी संघटनांनी जाहिर केलेल्या संपात सक्रियरित्या उतरण्याचा निर्णय सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघाने घेतला असून 7 जून रोजी धुळे, नवापूर, नंदूरबार, साक्री या तालुक्यात आदिवासी कष्टकरी शेतकरी स्त्री-पुरूषांच्या वतीने प्रंचड संख्येने निर्दशने करण्यात आले. बुधवार दि 7 रोजी सकाळी 11 वाजता धुळे,नंदूरबार, साक्री, नवापूर, मालेगाव, सटाणा, कन्नड, सोयगाव या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर सत्यशोधक कष्टकरी शेतकरी संघाच्या वतीने शेतकर्यांच्या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आले. भाजपा कार्यकर्ते तसेच आमदार, खासदार हे आंदोलकांना सामोरे न गेल्याने आंदोलकांमध्ये संताप दिसून आला. तसेच आ.गोटे यांच्या सौभाग्यवतींना निवेदन दिले.
शिवतीर्थ पोलीसांच्या गराड्यात
धुळ्यात भारतीय जनता पक्षाचे खासदार,आमदार,आक्रमक नेते, यांच्या घरावरही पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. चौथ्या गल्लीत आ.गोटे यांचे निवासस्थान आहे.त्यांच्या निवास्थानाला पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच आ.गोटे हे नेहमी संतोषी माता चौकातील शिवतिर्थाजवळ कार्यकर्त्यांच्या गराड्यात, जनतेला भेटण्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे शिवतिर्थावरही पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या निवासस्थानांना देखील पोलिसांचा गराडा पडला आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन आंदोलन करणारे शेतकरी आक्रमक झाले असल्याने ते या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करु शकतात ही शक्यता लक्षात घेवून आणि तशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे हा पोलिसबंदोबस्त लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मोर्चांला घाबरून पोलीस बंदोबस्त
राज्यभर सुरु असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनावरुन भाजपाची गोची झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गोंजारुन आणि अल्पभुधारक शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरुच आहे. शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून दि. 7 रोजी सत्यशोधक संघटनेने काढलेल्या मोर्चाला घाबरून भाजपाचे खासदार,आमदार तसेच कार्यकर्त्यांच्या घराला चक्क बंदोबस्त देण्यात आला होता. आंदोलक शेतकर्यांकडून किंवा त्यांना पाठबळ देणार्या राजकिय पक्षांकडून काही दगा फटका होवू नये म्हणून भाजपाचे आमदार,खासदारांना आता पोलिस बंदोबस्तात फिरण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. भाजपवाले शेतकर्यांना घाबरले अशा प्रतिक्रिया आता शहरातून उमटू लागल्या आहेत.
संपात फूट पाडणार्या मुख्यमंत्र्यांचा केला धिक्कार
धुळ्यात कॉ.किशोर ढमाले, कॉ.सुभाष काकुस्ते यांच्या नेतृत्वात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने दुपारी 2 वाजेनंतर केंद्रीय मंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आले. या आदोंलनात सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभा,सत्यशोधक क्रांती दलाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकरी,शेतमजूर सहभागी झाले होते. संपात फुट पाडण्याचा निंदनीय प्रयत्न करणार्या मुख्यमंत्री व त्यांच्या सहकार्यानी केला असल्याचा धिक्कार करण्याच्या घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको
शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तालुक्यांतील धुळे औरंगाबाद महामार्गावरील विंचूर चौफुलीवर सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.परिणामी, महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती. शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला अपयश येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी आंदोलन केले.यावेळी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे धुळे औरंगाबाद महार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण शिंदे व किरण पाटील यांनी केले. यावेळी प्रभाकर पाटील,प्रकाश बोरसे, जनार्दन देसले,वसंत पाटील,एकनाथ देवरे आदी उपस्थित होते.