सदस्यांची नावे जाहीर नाही

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांची निवड ही पहिल्या सर्वसाधारण सभेत होत असते. मंगळवारी 18 रोजी या पंचवार्षीकची पहिली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत विषय समिती सदस्य निवडीचा ठराव मांडण्यात आला. चारही गटनेत्यांनी विषय समिती सदस्य निवडीचा अधिकारी एकमताने जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना दिले. सदस्यपदासाठी 124 अर्ज घेण्यात आले. मात्र सभेत कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आली नाही. सर्वसाधारण सभेत नावे जाहिर करणे अपेक्षीत असतांना ते केले गेले नाही. त्यामुळे आता सदस्यांच्या नावाची घोषणा ही अध्यक्ष पुढील सभेतच करतील. विषय समिती सदस्य निवड प्रकिया पारदर्शी न झाल्याची नाराजी जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केली.

नाराजीच्या भितीने टाळली नावे
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष, सभापती निवडीवरुन भाजपात अंतर्गत वाद उद्भवल्याने अनेकांची नाराजी आहे. ही नाराजी पुन्हा विषय समिती सदस्यपद निवडतांना उद्भवू शकते त्या भितीने विषय समिती सदस्यांचे नावे सर्वसाधारण सभेत जाहिर करण्यात आले नाही. महत्त्वाच्या समितीत पदे मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. स्थायी समितीत एकुण 8 सदस्य असतात. सायंकाळपर्यत जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात नावाबाबत चाचपणी सुरु होती.

सर्व पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेत्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाला विषय समिती सदस्य निवडीची अधिकार बहाल केले. अध्यक्ष निर्णय घेऊन समिती सदस्यांची निवड करतील.
– सीईओ

विषय सिमती सदस्याची निवडणुक घेण्याची वेळ आली तर निवडणुकी संबंधी सर्व तयारी प्रशासनाने केली होती. मात्र अध्यक्षांना निवडीचे अधिकार देण्यात आले आहे. पारदर्शकपणे ही निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे. मात्र नावाची घोषणा अध्यक्षा करतील.
– नंदु वाणी, सचिव विषय समिती निवड

पत्रकारांना मज्जाव
ग्रामीण जनतेच्या विकासासाठी जिल्हा परिषद कार्य करत असल्याने जिल्हा परिषद होत असलेल्या हालचाली जनतेपर्यत पाहोचणे गरजेचे असते. जिल्हा परिषदेतील निवड तसेच इतर सभेत पत्रकारांना उपस्थित राहता येणार नाही असा नियम नसतांना जळगाव जिल्हा परिषदेत मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष, सभापती, विषय समिती सदस्य निवडीप्रसंगी सभागृहात बसण्यास मज्जाव केले जाते. वास्तविक राज्यातील कोणत्याही जिल्हा परिषदेत असे प्रकार दिसून येत नाही. जळगाव जिल्हा परिषदेतच का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. यामुळे नागरीकांमध्ये तर्कवितर्क चर्चेला उधान आले आहे.