सदाशिव पेठेत अवतरली चक्क वानरसेना!

0

पुणेकरांनी केले या पाहुण्यांचे मनापासून स्वागत

पुणे । पुणे शहरातील गजबजलेल्या सदाशिव पेठेत आज (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वानरांची एक टोळी मुख्य रस्त्यावर प्रकटली आणि ‘मर्कटलीला’ सादर केल्या. ही वानरे अचानक अवतरल्याने काही काळासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान पाहुण्यांच्या ’आदरातिथ्यासाठी’ प्रसिध्द असलेल्या सदाशिव पेठेतील पुणेकरांनी या पाहुण्यांना विविध खाद्यपदार्थ देत त्यांचे स्वागत केले. सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळ हा सर्व प्रकार घडला.

वानरांच्या जीवास धोका
शहरात आलेली ही वानरे अनेकदा झाडांवर चढतात किंवा रस्ता ओलांडून इतर ठिकाणी जातात. अशा वेळी रस्ता ओलांडताना एखादे वाहन आल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. तसेच ही वानरे कधी-कधी विजेच्या खांबावर जाऊन बसतात. त्यामुळे अशावेळी त्यांना विजेचा धक्का लागण्याची शक्यताही असते. माकड मरण पावल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे ती सुखरूप परत जंगलात जावीत, यासाठी काय करावे, असा प्रश्‍न प्राणीप्रेमींना पडला आहे.

खाद्यपदार्थ देत आदरातिथ्य
परिसरातील रहिवाशांनी या वानरांना पाव, केळी, शेंगदाणे यासारखे खाद्यपदार्थ देत त्यांचे आदरातिथ्य केले. या पाहुण्यांनीही कसलाही संकोच न बाळगता समोर येत त्या खाद्यपदार्थावर ताव मारला. अचानक अवतरलेल्या या पाहुण्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. या पाहुण्यांनी काही काळ दिलेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला आणि ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या समोर असलेल्या गल्लीतील घरांवरून ते पुढे निघून गेले. साधारणत: वानरे मार्च ते मे दरम्यान पाणी आणि खाद्याच्या शोधात शहरात शिरत असतात, परंतु सप्टेंबरमध्येच अशाप्रकारे त्यांचे शहरात येणे आश्‍चर्यजनक होते. याप्रकरणी भारतीय सर्पविद्यान संस्थेचे संचालक अनिल खैरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जवळपासच्या जंगलातील वानरांच्या टोळीतून ही टोळी विलग झाली असावी आणि त्यांनी शहरात धाव घेतली असावी. काही काळाने ही परत जंगलात जातील.