सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांना जादा बिलांचा शॉक

0

टेस्टिंग फी मधील वाढ अन्यायकारक ; प्रा.धीरज पाटलांची तक्रार

भुसावळ- शहर व तालुक्यातील 50 हजारांपेक्षा जास्त वीज ग्राहक सध्या वाढीव वीज देयकांनी त्रस्त असून सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत. भुसावळ विभागात हजारो वीजमीटर सदोष असल्याची बाब निदर्शनास आली असून सदोष मीटर लावणार्‍या कंपनीला महावितरणने नियमानुसार कसलाही दंड आकारलेला नाही. उलट ग्राहकांना अवाजवी बिले भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रा.धीरज पाटील वीज कंपनीकडे केली आहे.

ग्राहकांना कोट्यवधींचा फटका
2014 पासून अवाजवी वीज देयकांची समस्या सुरू आहे. 2013-14 पासून ग्राहकांची जुने वीजमीटर बदलून नवीन वीज मीटर बसवण्यात आले होते. सदोष वीज मीटरमुळे अवाजवी देयके येत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर दुसर्‍या कंपनीचे मीटर बदलण्यात आले परंतु या सर्व कंपन्यांचे निर्माते एकच असून वेगवेगळ्या नावाने ते उत्पादन करून सदोष मीटर बसवत होते. विविध कंपन्यांची सदोष मीटर लावल्याने वीज ग्राहकांना कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड पडला आहे. मागील काही वर्षापासून एलएनटी, एचपीएल, एचई, पीएम, रोलॅक्स, फ्लॅश व जिनस या सातमीटर उत्पादक कंपन्यांचे मीटर ग्राहकांना दिले जात आहेत. सातपैकी पीएम, रोलॅक्स, फ्लॅश या तीन कंपन्याना विज मीटर सदोष असल्याच्या कारणावरुन काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे प्रा.पाटील यांनी कळवले आहे.

टेस्टिंग फी मुळे ग्राहकांचा आर्थिक भुर्दंड वाढला
मीटर टेस्टिंगसाठी 150 रुपये आकारले जात होते तर आता 236 रुपये नवीन दर निर्धारित करण्यात आली आहे. मीटर टेस्टिंग फी मध्ये केलेली दरवाढ अन्यायकारक आहे, ती त्वरीत मागे घ्यावी आणि सदोष मीटर देणार्‍या कंपनीवर आर्थिक दंड लावून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी प्रा.धीरज पाटील यांच्यातर्फे अतिरीक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.