व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे मत
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते. त्यांच्या काळात रयतेचे राज्य होते. महिलांचा आदर आणि कुशलतेने न्यायदानाचे काम होत होते. तर, आताचे राज्य हुकुमशाहीचे आणि स्वार्थ साधण्याचे आहे, असे मत व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. भारिप बहुजन महासंघ व सलोखा शोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत गुरुवारी (दि.24) व्याख्यान व वाघेर्या चित्रपटातील सर्व कलाकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर कोकाटे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सलोखा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल ओव्हाळ होते. या प्रसंगी व्याख्यात्या प्रा. सुषमा अंधारे, भारिपचे जिल्हाध्यक्ष रामहरी ओव्हाळ, महिला शहराध्यक्ष लता रोकडे, के.डी. वाघमारे, राजेश भारसागडे, महादेव मगर, सनी गायकवाड, गुलाब पाटीव, सरला उपखट, सुहास अंबेकर, सुहास देशमुख, निलेश रासकर, महादेव लोखंडे आदी उपस्थित होते.
शिवरायांनादेखील त्रास झाला
श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले की, शिवरायांच्या काळात सुजलाम सुफलाम अशी अवस्था होती. तेव्हाचे मंत्रीमंडळ आणि आताचे मंत्रीमंडळ यात जमीन अस्मानचा फरक आहे. रयतेचे राज्य निर्माण करत असताना शिवरायांना देखील काही मंडळींनी त्रास दिला. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या कायद्याच्या राज्यासाठी प्रकाश आंबेडकर झटत आहेत. त्यांना बहुजन समाजाने साथ द्यायला हवी.
आंबेडकर चळवळीत परिवर्तन
प्रा. सुषमा अंधारे म्हणाल्या की, दलित, बहुजनांवरील अन्याय अंत्याचाराला पँथरपासून ते आता भारिपपर्यंत संघटनांनी आवाज उठविला. वेळेनुसार आंबेडकर चळवळीत परिवर्तन होत आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर सध्या परिवर्तनाची लढाई लढत आहेत. त्याच्या हाकेला साथ सर्व स्तरातून मिळत असून खर्या नेतृत्वाची जाण लोकांना झाली आहे. त्यांच्या विश्वास टाकून काम करण्याची सध्या गरज आहे
संघटनांमध्ये सलोख्याचे प्रयत्न
प्रास्ताविकात देवेंद्र तायडे म्हणाले की, बहुजन संघटनांमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. मात्र, आंदोलन, कार्यक्रम करीत असताना ते दडपविण्याचा प्रयत्न वारंवार होतो. आता भारिप पक्ष मजबूत करण्यासाठी वाटचाल सुरू आहे. भारत कुभांर यांनी सूत्रसंचालन केले. तर, हरिष डोळस यांनी आभार मानले. सुधाकर साबळे, विजय ओव्हाळ, भानुदास दाभाडे, राहुल इनकर यांनी संयोजन केले. कार्यक्रमाला परिसरातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली.