नवी दिल्ली । भारतातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर टाटा यांनी केलेल्या उपचारांनी श्रीलंकेचा माजी क्रिकेट कर्णधार सनथ जयसूर्या तंदुरुस्त झाल्याचे सांगितले जात आहे. गेले काही दिवस जयसूर्या कंबर आणि पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त होता. त्याला चालतानादेखील आधार घ्यावा लागत होता. अखेर भारताचा माजी कर्णधार अझरूद्दीन याने डॉ. टाटा याची भेट घेऊन आयुर्वेद उपचार करण्याचा सल्ला जयसूर्याला दिला. त्याप्रमाणे जयसूर्याने मुंबईत डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी जंगली आयुर्वेदिक वनस्पती आणल्या व त्यापासून औषध तयार केले व श्रीलंकेला जाऊन जयसूर्यावर तीन दिवस उपचार केले.
या काळात जयसूर्या स्वतःच्या पायावर कोणताही आधार न घेता उभा राहू शकला असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. अनेक दिवस बेडवर असलेल्या जयसूर्याला चालणे अशक्य झाले होते. त्याने यावर ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेत शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नव्हता.