सनी लिओनीला शोधताना!

0

खरं तर आपल्याकडे दर्जा ठरवण्याच्या पद्धतीच मुळात चुकीच्या आहेत. याला पारंपरिक मानसिकता जबाबदार आहे. देशातील सेक्स करणार्‍या आणि केलेल्या 100 टक्के पुरुषांना सनी लिओनी कोण आहे ते माहितीय. महिलांचे म्हणाल तर जास्तीत जास्त 30 टक्के महिलांना माहिती असावं. ग्रामीण भागात तर 2-5 टक्केच. यातल्या बहुतांश स्रियांना सनी ही वाईट काम करते अर्थात ती देहाचा धंदा करते यापलीकडे काहीच माहिती नाही. जो छुपा अत्याचार त्यांच्यावर रोज होत असतो, दरवाज्याबाहेर जगण्याचे स्वातंत्र्य त्यांना नसते. लिपिस्टिक अंडर माय बुरखा म्हणून वावरणार्‍या अनेक स्त्रियांना फक्त संस्कारी आणि संस्कृतीवान या नावाचं बक्षिस देऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोखडून ठेवलं गेलंय हे सत्य आहे.

या अशा समाजात येऊन सनी लिओनी आपलं नवीन अस्तिव निर्माण करतेय आणि या समाजाला लागणार्‍या सभ्यतेला अंगीकरण्याचा प्रयत्न करतेय. तिचं पॉर्न अजूनही आपल्याला हवंय, मात्र उघडपणे नव्हे तर बंद दरवाजाच्या आत. प्रतीक पाटील या मित्राने याबाबत फार उत्तम पद्धतीने सांगितलंय. तो म्हणतो, सनी लिओनी भारतात कशासाठी आली होती हा प्रश्‍न वेगळा आहे. परंतु, इथे आल्यावर तिने बॉलिवूडमध्ये टिकायचे असेल तर हिंदी यायला हवी, तिने ती शिकली. विविध डान्स फॉर्म शिकून प्रत्येक सिनेमात आपले एक गाणे फिक्स केले आणि बॉलिवूडमधील स्थान मजबूत केले. तरी मुद्दामहून तिच्या या गोष्टीकडे न बघता भलत्याच विषयावर चर्चा होत राहिली. तिने याबाबत कधी ना तक्रार केली ना दुःख व्यक्त केले. सनी लिओनी पॉर्नस्टार होती, तो तिचा इतिहास होता. सनीने लातूरच्या एका मुलीला दत्तक घेतले. निशा नाव ठेवलंय तिचं. तिला दत्तक घेताना दत्तक घेतलंय असं ना सांगता त्या चिमुरडीने आम्हाला पालक म्हणून निवडलंय, असं सनी सांगतेय. आता खरोखर सनी आपल्या सामाजिक प्रतिष्ठांच्या मापांमध्ये अजूनही पॉर्नस्टारच राहील की सामाजिक संवेदना जिवंत असलेली एक जागृत माणूस म्हणून जगेल हे पाहणे चिंतनाचा मुद्दा आहे. म्हणजे 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, स्वतःच्या पोटच्या पोरीवर बापानं केलेला अत्याचार, लहान पोरांवर होणारे लैंगिक अत्याचार, स्वतःच्या मुलीला बळजबरी धंद्याला लावणारी आई, प्रियकरासाठी नवर्‍याला आणि लेकरांना मारणारी आई, निर्घृणपणे होणारे विकृत सामूहिक बलात्कार अन खून या सर्व आणि यापेक्षा भयानक लैंगिक अत्याचाराच्या घटना वाचल्यावर खुलेआम नग्न होणारी सनी संस्कृतीवान वाटायला लागते. आता सनीला शोधताना आपल्याला तिच्याकडून नेमकं काय घ्यायचंय हे ठरवायला दोन ऑप्शन तिने तयार केलेत. तिने तिचा भूतकाळ फेकून दिलाय, आपण वर्तमानात तिला स्वीकारणे आवश्यक आहे.
निलेश झालटे – 9822721292