सफाई कर्मचार्‍यांच्या वस्तीचा होणार विकास : 25 लाखांचा निधी देणार

0

आमदार संजय सावकारे यांची ग्वाही : भुसावळ पालिकेत सफाई कामगार दिन

भुसावळ- सफाई कामगारांच्या हिताची मला आपल्याला जाणीव असून त्यांचे प्रश्‍न विधानसभेत मांडून आपण न्यायदेखील दिला आहे. सफाई कामगारांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना शिक्षित करावे तसेच सफाई कामगारांच्या वस्तीत विकासकामे होण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी देत असल्याची ग्वाही आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. पालिका सभागृहात मंगळवारी सफाई कामगार दिनानिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी आमदार सावकारे बोलत होते. नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, युवराज लोणारी, देवा वाणी, राजू सुर्यवंशी, सेवानिवृत्त असोसिएशनचे अध्यक्ष एस. एल. पाटील आदी उपस्थित होते.

लाड समितीच्या शिफारशीनुसार नेमणुका -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष भोळे यांनी सफाई कामगारांच्या अडचणी सोडविण्याची ग्वाही देत सफाई कामगारांना गणवेश, गमबुट, रेनकोट आदी साहित्य व नियमित वेतन दिले जाईल, असे सांगितले. सेवानिवृत्त सफाई कर्मचार्‍यांच्या उत्पादन, अर्जित रजा, भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमा व लाड समितीच्या शिफारशीनुसार नेमणुका केल्या जातील असे आश्‍वासित केले. आमदार सावकारे, रमण भोळे, मुख्याधिकारी आदींनी सफाई कामगारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. युवराज नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. शहरातील अनेक महिला व पुरुष सफाई कामगार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

आरोग्याची जवाबदारी आपल्यावर -मुख्याधिकारी
मुख्याधिकारी दोरकुळकर यांनी सफाई कामगारांना माझे सहकारी म्हणून संबोधित करुन शहराच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव करून दिली. पालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी प्रास्ताविक केले. युवराज लोणारी, राजू सूर्यवंशी यांनी विचार मांडले. यशस्वीतोसठी दिनेश अहिरे, विपुल चांदेकर, अशोक फालक, निवृत्ती पाटील, प्रदीप पवार, वसंत राठोड, राजेंद्र पाटील, प्रमोद मेढे, शाम गिरी, दत्तात्रय नेमाडे आदींनी परीम घेतले.