सबा करिम बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी

0

मुंबई । भारताचे माजी विकेटकिपर सबा करिम यांची बीसीसीआयने क्रिकेट ऑपरेशन्सच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केली आहे. परस्पर हितसंबधाच्या मुद्द्यावरुन एम.वी. श्रीधर यांनी राजीनामा दिल्यावर हे पद मोकळे होते. करिम नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीला आपल्या नवीन पदाची जबाबदारी स्विकारतील. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना करिम आपल्या कार्याचा अहवाल देतील.

बीसीसीआयने ऑक्टोबर महिन्यात महाव्यवस्थापक-क्रिकेट ऑपरेशन्स पदासाठी अर्ज मागावले होते. बीसीसीआयसाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केल्याचा आणि क्रिकेटमधील वेगवेगळ्या कामकाजाचा अनुभवाचा निकष बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवताना ठेवला होता. महाव्यवस्थापक म्हणुन काम करताना करिम यांना, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सूचना करणे, मंडळाने मान्य केलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे, आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे, सामना स्थळांचे मानक ठरवणे, स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक नक्की करणे अशा जबाबदार्‍या पार पाडाव्या लागणार आहेत. करिम यांनी जानेवारी 1997 ते नोव्हेंबर 2000 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एक कसोटी आणि 34 एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. देशातंर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी बिहार आणि नंतर बंगालचे प्रतिनिधीत्व केले. 100 हून अधिक सामन्यांमध्ये त्यांनी सात हजारहून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य म्हणूनही काम पाहीले आहे. निवड समितीतील मुदत संपल्यावर करिम यांनी विविध क्रीडा वाहिन्यांवर समालोचकाची भूमिका पार पाडली होती.