पिंपरी-चिंचवड :- महापालिकेच्या विविध सभेदरम्यान कुणी कर्मचारी सभागृहाबाहेर आढळून आल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत. विविध सभेदरम्यान सभागृहाबाहेर कर्मचा-यांनी थांबू नये. आपल्या विभागात आपले काम करावे,असेही त्यांनी सांगितले आहे.
दर महिन्याच्या 20 तारखेला महापालिकेची सर्व साधारण सभा पहिल्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात होते. तर दर बुधवारी तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची साप्ताहिक सभा होते. त्याचप्रमाणे विविध विषय समित्यांच्या सभा नियमितपणे होतात. सभा कामकाजासाठी महापालिकेचे अधिकारी त्यांच्या सोबत संबंधित विभागातील ड वर्गाचे कर्मचारी कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहतात. सभेचे कामकाज सुरु असताना ‘ड’ वर्गाचे कर्मचारी आपल्या विभागात न जाता सभागृहाबाहेर नाहक थांबून व्यर्थ वेळ घालवित असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे त्यांच्या विभागातील कामांचा खोळंबा होतो. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, विविध विषय समिती, तसेच अन्य कोणत्याही सभेला उपस्थित राहताना अधिका-यांनी आपल्या विभागातील ‘ड’ वर्गातील कर्मचा-यांना सभा कामकाज संपेपर्यत नाहक थांबवून ठेवू नये. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यकता असल्यास विभाग प्रमुखांनी संबंधित कर्मचा-यास पुन्हा बोलवून घ्यावे. सबंधित कर्मचारी त्या ठिकाणी वेळ वाया घालवणार नाही, याची व्यक्तीशः दक्षता घ्यावी, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत.