जळगाव। स्थायी सभापती वर्षा खडके यांनी आज खोटेनगर परिसरातील हिराशिवा येथील पाण्याच्या टाकीची पहाणी दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका ज्योती इंगळे देखील उपस्थित होत्या. पाण्याच्या टाकीला भेट दिल्यावर सभापतींना टाकीच्या परिसरात अस्वच्छता दिसून आली. या भेटीत कार्यालयाची अवस्था देखील बिकट झालेली सभापतींना दिसून आली. कार्यालयाच्या परिसरात दोन ते तीन ट्रॅक्टर गाळ पडलेला आढळला. तर कार्यालयाच्या भिंतींवर तंबाखू खाऊन थुंकलेले आढळले. तसेच गोडावूनची पाहणी केली असता त्यांना तुटलेल्या पाईपसह तुटलेल्या खुर्ची पडलेल्या दिसून आल्या.
फक्त दोनच कर्मचारी उपस्थित….
सभापती वर्षा खडके यांनी पाणी पुरवठा कार्यालयाची तपासणी केली असता त्यांना पाणी पुरवठा विभागाचे केवळ दोनच कर्मचारी तेथे आढळून आले. या कार्यालयात एकूण पाणी पुरवठा विभागाचे एकूण 21 कर्मचारी आहेत. पाणी टाकी परिसरात सर्वत्र अस्वच्छता दिसून आल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने सभापती वर्षा खडके यांनी रोष व्यक्त केला. पाणी टाकी परीरात सर्वत्र घाण साचलेली दिसून आली. तर टाकीच्या कपांडवॉलमध्येच जुगार खेळण्यासाठीचे पत्त्यांचे कॅट पडलेले होते. तसेच कार्यालयात देखील अस्वच्छतेसह भिंतींवर जाळे लागलेले दिसून आले. टाकी परिसरातील शौचालयांची दुरावस्था झालेली आहे. या शौंचालयांचे दरवाजे, सीट्स तुटलेले दिसून आले. तसेच या शौचालयांच्या समोर गवत उगविलेले आहे.