एसटी कर्मचारी पतपेढीच्या 58 वी वार्षिक सर्व साधारण सभा
जळगाव : जिल्हा पत्रकार भवनात एसटी कर्मचारी पतपेढीची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. मात्र गोंधळामुळे तासाभरातच सभा गुंडाळण्यात आली. सभासदांची संख्या पुरेशी नसताना सभेला सुरुवातच झाली असा आरोप उशीरा आलेल्या सभासदांनी केल्याने गोंधळात भर पडली. हा गोंधळ पाहता संचालकांनी सभा बरखास्त करून तिथून काढता पाय घेतला. सभेसाठी बाहेरगावांहून आलेल्या सभासदांना सभेविना तसेच भत्ता न मिळताच परतण्याची वेळ आली.
एसटी पतपेढीची जिल्ह्यात एकूण सभासद संख्या 4 हजार 561 आहे. सभेसाठी पूर्ण जिल्ह्यातून सभासदाना निमंत्रित करण्यात आले होते. सभेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. कर्मचार्यांची संख्या पुरेशी नसताना सभेला कशी सुरुवात झाली असा आरोप काहि कर्मचार्यांनी केल्याने गोंधळ उडाला. तसेच वार्षिक सभेत काय ठराव घेतले याची पुरेशी माहिती न देता संचालक मंडळाने तिथून काढता पाय घेतल्याचे एसटीतील कर्मचारी आरोप करत होते. दुपारी एक वाजेनंतर जिल्ह्यातून पतपेढीचे सभासद आपला भत्ता घेण्यासाठी आले असता त्यांना सभा संपली असल्याचे माहित पडले त्यामुळे जास्त गोंधळ उडाला.
भत्ता न मिळाल्याने सभासदांची नाराजी
एसटी पतपेढीकडून कर्मचार्यांच्या पगारातून 800 रु कपात करून या पतपेढीत जमा केले जातात. वार्षिक सभेला पूर्ण जिल्ह्यातून कर्मचार्याना बोलावून हि सभा घेतली जाते. सभा संपल्यानंतर कर्मचार्याना 400 रु भत्ता दिला जातो. तो भत्ता न दिल्यामुळे कर्मचारी जास्त नाराज झाले. या पतपेढीचे सभासद पूर्ण जिल्ह्याभरातून असून सभेसाठी दुपारी 1 वाजेनंतर यायला सुरुवात झाली होती. एक वाजेच्या आत हि सभा संपल्याने त्यांना भत्ता न घेताच परतण्याची वेळ आली.