समतानगरमधील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी धरणे आंदोलन

0

जळगाव । शहरातील समता नगर प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी जळगाव शहर जागृत नागरिक मंच व सर्व समविचारी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. अद्याप या घटनेतील आरोपी नेमके कोण व किती याबाबत उलगडा झालेला नाही, बारा ते तेरा दिवस उलटूनही अद्याप खुनाचा उलगडा होत नाही ही दुर्दैवी घटना असून पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील महिला व मुलींच्या मनात क्रोध निर्माण झाला आहे. अशा घटनांमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे़ त्यामुळे समता नगरमधील अवैध धंदे बंद करत या घटनेतील खुनाची पाळेमुळे शोधून काढली पाहिजे; यासाठी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत़ तसेच जळगाव शहरातील नागरिकांच्या मनातील भावना लक्षात घेऊन त्वरीत न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
समता नगरमधील बालिकेच्या खून व अत्याचाराच्या घटनेतील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक करा, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी देण्यात यावी, अत्याचार पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत दिली जावी, समतानगर भागात एक पोलीस चौकी उभारली जावी, जळगाव शहरातील अवैध धंदे बंद करण्यत यावेत, समता नगर हा अवैध धंद्यांचा अड्डा असून अनेक तरुण मुले व्यसनाधिन झालेली असल्याने हे अवैध धंदे बंद व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.