समतानगरातून चोरट्याने 78 हजारांचा लांबविला ऐवज

0

जाळीची खिडकी तोडून घरात प्रवेश ; 50 हजार रोख रकमेसह दागिण्यांवर डल्ला

जळगाव- कुलूपबंद घराच्या तुटलेल्या जाळीच्या खिडकीतून घरात प्रवेश केला अन् घरातून घेतलेल्या चाबीच्या साहाय्याने रोकड असलेल्या खोलीचे कुलूप उघडून चोरट्याने 50 हजार रोख रकमेसह दागिने असा 78 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी शहरातील समतानगर परिसरात घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक यांच्यासहस ठसे तज्ञांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली होती. कुटुंबातील कुणीतरी एकाने हा प्रकार केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

छायाबाई पाटील (40) या महिला शिवमंदिराजवळ समतानगर परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा पाचोरा येथे राहतो. दरम्यान महिलेचा नातू दादू हा आजारी पडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. हा प्रकार कळाल्याने मंगळवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून छायाबाई नातवास पाहण्यासाठी पाचोरा येथे रवाना झाल्या होत्या.

रोकड, दागिणे लांबविले
मंगळवारी मध्यरात्रीनंतर घराच्या तुटलेल्या जाळीच्या खिडकीतून घरात प्रवेश केला. नंतर संशयीत घरातील चाबी घेऊन घराबाहेर आला. शेजारील खोलीचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने 50 हजारांची रोकड, 16 हजारांची 8 ग्रॅमची सोन्याची चैन, 12 हजाराचे 6 ग्रॅमचे मनी असा 78 हजारांचा ऐवज लांबविला. बुधवारी सकाळी महिला पाचोर्‍याहून समतानगरात परत आल्या बाजूच्या खोलीचे कुलूप उघडून रोकड व दागिणे लंपास झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

अन् पोलीस उपअधीक्षक राहिले ताटकळत
घटना कळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी थेट समतानगर गाठले. त्या ठिकाणाहुन त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. प्रभारी पोलीस निरीक्षक अकबर पटेल, उपनिरीक्षक कांचन काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचार्‍यांच्या प्रतिक्षेत डॉ.
रोहन तब्बल अर्धातास घटनास्थळी ताटकळत उभे होते.