समांतर रस्ते प्रश्‍नी पालिका व रेल्वेने केली अधिकार्‍यांची नियुक्ती

0

लवकरच सुटणार तिढा ; जंक्शन शहर टाकणार कात -लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला विश्‍वास

भुसावळ- शहरातील वाहतूक प्रश्‍न सोडवण्यासाठी वरणगावरोडला समांतर नवीन रस्त्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात रेल्वे व पालिका प्रशासनाने जागेची अदला-बदली करण्यास सकारात्मक दिल्यानंतर सोमवारी डीआरएम कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या ईमारतीसह रेल्वेच्या जागेचे मूल्यांकन ठरवण्यासाठी तसेच पुढील प्रक्रियेला गती ठरवण्यासाठी रेल्वे व पालिका प्रशासनाने अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यावर एकमताने शिक्कामोर्तब केले. रेल्वे स्थानकाबाहेरील तसेच हंबर्डी चौकातील वाहतूक कोंडीचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्‍वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.

रेल्वे व पालिका प्रशासनातर्फे अधिकार्‍यांची नियुक्ती
सोमवारी संकाळी डीआरएम आर.के.यादव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिास दोरकुळकर, पालिका शहर अभियंता माधव पाटील, महेश चौधरी, सेवानिवृत्त अभियंता अनिल चौधरी, सिनी.डीईनको राजेश चिखले, डिव्हीजनल इंजिनिअर एम.एस.तोमर (स्टेशन वर्क) आदींची प्रसंगी उपस्थिती होती. रेल्वे स्थानकाला जोडणार्‍या रस्त्यांचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन रेल्वे विभागाचे असून सध्यस्थितीत असलेला वरणगाव रोडला गार्ड लाईनच्या आतील भागातून समातंर रस्ता तयार करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे शिवाय पालिकेची जीर्ण ईमारत रेल्वे प्रशासन घेणार असून त्या मोबदल्यात रेल्वे लोहमार्ग वसाहतीची जागा पालिकेला देण्यात येणार आहे. पालिका जागेचे मूल्य अधिक असल्याने त्या संदर्भात संपूर्ण सर्वे करून व्हॅल्यूशन केले जाणार आहे. सोमवारच्या बैठकीत पदाधिकार्‍यांनी या विषयावर मंथून करून रेल्वे व पालिका प्रशासनाने या विषयासाठी स्वतंत्र अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे ठरले तसेच संबंधित अधिकार्‍यांनी अहवाल दिल्यानंतर तातडीने पुढील पावले उचलण्याचेदेखील सांगण्यात आले.

पालिकेने केली अधिकार्‍यांची नियुक्ती
पालिका समांतर रस्ते प्रश्‍नी तसेच पालिका ईमारतीचे मूल्य ठरवण्यासाठी तीन अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यात शहर अभियंता माधव पाटील, सेवानिवृत्त अभियंता अनिल चौधरी, महेश चौधरी यांचा समावेश असणार आहे.