जळगाव । जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांना शासनाकडून देण्यात आलेले शासकीय वाहन त्यांचा मुलगा कुटूंबासाठी वापरत असल्याचे दिसून येत आहे. या वाहनावर शासकीय वाहनचालक नसून स्वःत सभापतींचा मुलगा संबंधित वाहन चालवतो. हा प्रकार बेकायदेशीर असून शासकीय नियमबाह्य आहे. त्यामुळे संंबंधित सभापतीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कानळदा येथील महेश सोनवणे यांनी केली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यांच्या सोबत गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा
समाजकल्याण सभापती सोनवणे यांना प्रशासनाने संबंधित विभागाशी संलग्नित असलेल्या कामांसाठीच हे वाहन वापरासाठी देण्यात आलेले आहे. मात्र सभापती हे नेहमी आपले खाजगी वापरतात. एवढेच नव्हे तर ते जिल्हा परिषदेमध्ये सुध्दा त्यांची स्वत:च्या मालकीच्या वाहनातून येतात. शासनाने दिलेल्या महेंद्र वैंपनीची बेलोरे एमएच-19-689 क्रमांकाचे वाहन त्यांचे चिरंजीव गणेश सोनवणे हे कुटूंबासाठी तसेच आपल्या खाजगी कामा निमित सर्रास वापरत आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. तसेच जिल्हा परिषद सुध्दा भाजपाच्याच ताब्यात आहे. त्यामुळे बेकायदेशीर व शासकीय नियामवलींचे उल्लंघन करुन सभापतींचे चिरंजीव दिवसा ढवळ्या शासकीय वाहनचालक नसताना स्वत: वाहन चालवून आपली खाजगी कामे करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या समिती सभापतींना तसेच पंचायत समिती सभापतींना शासकीय वाहन प्रशासकीय कामांसाठी देण्यात आलेले असते. संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही महेश शामराव सोनवणे यांनी तक्रार अर्जाद्वारे दिला आहे.
शासकीय वाहनांचा खाजगी कामासाठी उपयोग होत असल्याने शासनाचे होते आहे नुकसान
सर्वप्रथम वर्ग श्रेणीचे अधिकारी तसेच पदाधिकार्यांना शासकीय वाहने वापरण्यासाठी मिळतात. या वाहनांचा देखरेख खर्च व इंधनाचा खर्च हे शासन करीत असते. जिल्ह्याभरातील वाहनांवर होणारा खर्च दर महिन्याला लाखोच्या घरात आहे. मात्र शासकीय वाहनांचा स्वतःच्या खाजगी कामासाठी उपयोग होत असल्याने शासनाचा पैसा खर्च केला जात आहे. त्यामुळे शासनाला मोठा भुर्दड बसत आहे.