समाजकार्य महाविद्यालयातर्फे गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप

0

चोपडा । समाजातील गरजवंतांप्रती दानाची किंवा उपकाराची भावना न ठेवता त्यांच्या विषयी असलेली सहवेदना ही मोठी उदात्त व श्रेष्ठ भावना आहे, असे प्रतिपादन करत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी भगिनी मंडळाच्या ’गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप’ या उपक्रमाचे कौतुक केले. फ्यूचर इंडिया लिमिटेड, मुंबई व सेवासहयोग, पुणे या संस्थांच्या सौजन्याने व भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप कार्यक्रमात बोलत होते. भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्यावेळी मंचावर भगिनी मंडळाच्या सचिव उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार डॉ.स्वप्निल सोनवणे, महेश साळुंखे, बीडीओ ए.जे.तडवी, गटशिक्षणाधिकारी एस.सी. पवार, सेवा सहयोग संस्थेचे प्रा.विक्रांत जाधव, कार्यक्रम समन्वयक प्रा.आशिष गुजराथी, प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, प्राचार्य राजेंद्र महाजन, मुख्याध्यापक सुनील चौधरी, डॉ.संजय चौधरी, अरुण संदानशिव हे उपस्थित होते.

700 विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात
विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी शिकत आपले व्यक्तिमत्व संपन्न करावे. आपल्यालाही शालेय जीवनातील अशाच बक्षिसांच्या रकमेतून मदत मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगत भगिनी मंडळ आणि सेवा सहयोग या संस्थांचे अभिनंदन केले. दरम्यान ’सेवा सहयोग’चे प्रा. विक्रांत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. जि.प. प्राथमिक शाळा, प्रेरणा मतिमंद विद्यालय, बालकामगार शाळा, महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कपडे वाटप करण्यात आले असून सुमारे 700 गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बारी, आभार प्रदर्शन अरुण संदानशिव यांनी मानले.