निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे मत; सातव्या सम्यक साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : “सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी समाजप्रबोधन होणे गरजेचे असून, ते प्रबोधन करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. ही जबाबदारी पार पाडताना साहित्यिकानीं क्रांतिकारक व्हायला हवे. समाजात बदल घडवायला हवेत. शब्द, शास्त्र वापरून समतेवर, बंधुत्वावर आधारलेला संविधानिक समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ माणुसकीच्या निकषावर तपासून जगणारा धर्म आणायचा आहे. तरच आपण आणि जगही वाचेल,” असे मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी सावंत बोलत होते. संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात गंगाधर पानतावणे विचारमंचावर झालेल्या या कार्यक्रमावेळी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रकाशक प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, प्रा किरण सुरवसे, दीपक म्हस्के, अमरनाथ सिंग, धर्मराज निमसरकर, संजय सोनावणे आदी उपस्थित होते.
पी. बी. सावंत म्हणाले, “समाजाची मानसिकता शेकडो वर्षे निरनिराळ्या विषाने भरली आहे. जातीअंधता, धर्मांधता, गुलामगिरी या सर्वांच्या मुळाशी स्वार्थ, असहिष्णूता, द्वेष अशा विषाणूंची गर्दी आहे. साहित्यिक या विषाणूंचा नायनाट करू शकतील. पूर्वजांच्या चुकांची ओझी पुढे नेण्याची जबाबदारी नसली, तरी ते दुरुस्त करणे हे कर्तव्य आहे. त्यासाठी बंडखोर व्हावे लागेल, रोष स्वीकारावे लागेल. पण जे हे व्रत पाळतील तेच हे कार्य करू शकतील. हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे कार्य आहे. ते स्वीकारण्याची तयारी दाखवावी. मन जेवढं निर्भय, विशाल होत पण जेवढं
संकुचित करू तेवढं संकुचित होत. त्याची मशागत आपणच करायला हवे. मन समृद्ध करायला हवे. म्हणजे जीवन प्रवास सुखकर आणि समृध्द होईल. सामाजिक, राजकीय सुधारक हीफक्त आपल्या जमातीचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करतात. यामुळे देश व साहित्याचे नुकसान झाले. नवोदित लोक प्रस्तापितांचा आदर्श ठेऊन त्यांचेच अनुकरण करतात. ही मानसिक, बौद्धिक गुलामगिरी आहे, जागृती नाही. आता स्वतंत्र बुद्धीने विश्लेषण करून उपाय शोधायला हवे. तरच समाजाला जे मार्गदर्शन हवे ते मिळेल तरच क्रांती होऊ शकेल. साहित्यिकाला जागतिक परिस्थितीचेही निरीक्षण करायला हवे.”असे त्यांनी नमूद केले.
ऐनापुरे म्हणाले, “स्पष्टपणे बोलण्याची आवश्यकता आहे. देशात सध्या परिस्थितीने काहूर माजले आहे. कधी नव्हती तेवढी अशांतता आहे. हीच चिंतेची बाब आहे. आपल्याला आता नव्याने हा लढा उभा करण्याची वेळ आली असून धोकादायक परिस्थिती कशी दूर करायची हा प्रश्न आहे. ईश्वर, पाप, पुण्य, आत्मा आशा अनेक काल्पनिक गोष्टी उभी करून सर्वसामान्य माणसाला गुंतवून ठेवले आहे. अशा परिस्थितीत अशा संमेलनाची आवश्यकता आहे. जुनी मनूच्या काळातील स्थिती येऊ नये अशी आशा करू. आता खरी समतेची लढाई सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही. स्वाभिमान आणि अस्तित्वाची लढाई आहे असे ऐनापुरे म्हणाले.
प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ यांनीही आपले विचार मांडले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय खरे यांनी आभार मानले.