समाजवादाचा वटवृक्ष कोसळला!

0

संपूर्ण आयुष्य ज्यांनी समाजवादी, निधर्मी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले, उपेक्षित, कष्टकरी आणि वंचितांच्या भल्यासाठी ज्यांनी देह झिजवला ते भाई वैद्य मृत्यूशी सामना हरले आहेत. त्यांच्या निधनाने चळवळीची अतोनात हानी झाली. भाई हे चळवळीतील वटवृक्ष होते, त्यांच्या निधनाने हा वटवृक्षच उन्मळून पडला. त्यांच्यासारखे सत्शील राजकीय, सामाजिक नेतृत्व आता पुन्हा होणे नाही!

आपल्या विचार आणि तत्त्वाशी कायम एकनिष्ठ राहिलेले भाई उपाख्य भालचंद्र सदाशिव वैद्य हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री राहिले होते. आजकाल मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या जेव्हा सुरस कथा ऐकायला येतात, तेव्हा भाईंची मंत्रिपदाची कारकीर्द आठवली की, आश्‍चर्य वाटते. त्यांच्या मोठेपणाची आणि सत्शील चारित्र्याची साक्षही पटते. एका मोठ्या स्मगलरने भाईंना तीन लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, हे पैसे घेऊन तो भाईंच्या घरी आला होता. भाईंनी ताबडतोब त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुरुंगात पाठवले होते. घरी आलेली अशी लक्ष्मी आज कुणी मंत्री ठोकरेल काय? राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी आदर्श प्रस्थापित केला. एकूणच त्यांचे जीवन हे दीपस्तंभासारखे आहे. आजच्या राजकारण आणि समाजकारणात काम करणार्‍या प्रत्येकाने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तसे वागण्याचा प्रयत्न केला, तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. भाईंना चळवळीची पृष्ठभूमी होती, शालेय जीवनात असताना 1942च्या चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. गोवामुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. परिणामी, या सर्व आंदोलनात त्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्यात, तुरुंगवास भोगावा लागला. स्व. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली तेव्हादेखील भाईंनी त्यांच्याविरोधात आवाज उठवला. परिणामी, त्यांना 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला. संघर्षमय आयुष्यात भाईंनी सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 25 वेळा तुरुंगवास भोगलेला आहे. त्यांचा हा संघर्ष शेवटपर्यंत संपला नाही. अगदी अलीकडेच वयाच्या 88 व्यावर्षीदेखील त्यांनी शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली होती. कष्टकरी, शोषित आणि वंचितांच्या न्यायहक्कासाठी उभे आयुष्य झोकून देणारे भाई हे समाजवादी चळवळीतील अद्भुत असे नेतृत्व होते. समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह हे वडाचे झाड होते. म्हणून, भाईदेखील आम्हाला वंचितांसाठीचे वटवृक्षच वाटतात.

1942च्या चळवळीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलनात उतरलेले भाई पुढे दिग्गज राजकारणी होतील, असे सर्वांनाच वाटले होते. कारण समाजकारण आणि राजकारण हा भाईंचा पिंडच होता. त्यामुळेच 1946 साली जेव्हा लोकनायक जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, एस. एम. जोशी यांनी काँग्रेस सोशॅलिस्ट पक्षाला ऊर्जितावस्था दिली तेव्हा मिसरूडही न फुटलेले भाई या चळवळीत सक्रिय झाले. तेव्हापासून त्यांच्यावर समाजवादी विचाराचा जो पगडा बसला तो अखेरपर्यंत कायम होता. पक्षाचे नाव बदलले. परंतु, पक्षाचा झेंडा व समाजवादी विचार भाईंनी कधीच सोडला नाही. खरे तर भाई हे राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या विचारांना मानणारे होते, ते सत्यशोधकीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या कार्य व विचारामुळेही ते प्रभावित झालेले होते. ही विचारधारा त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग होतीच. परंतु, या विचारांशी साम्य दर्शवणारी समाजवादी विचारधारा त्यांनी राजकीय जीवनात अंगीकारली आणि त्यानुसारच आपले राजकीय जीवन व्यतित केले. हमीद दलवाई यांच्याशी तर त्यांचे खास सौख्य होते. मुस्लीम सत्यशोधक चळवळीतही त्यांनी हमीदभाईंना तोलामोलाची साथ दिली. या दोघांच्या वैचारिक ऋणानुबंधाच्या आठवणी तर समाजवादी विचाराच्या चळवळीत काम करणार्‍या प्रत्येकाच्या ओठावर आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ते अस्वस्थ होते, अशीच अस्वस्थता त्यांना आणीबाणीच्या काळात जाणवली होती. देशात इंदिराजींनी आणीबाणी लागू केली तेव्हा ते पुण्याचे महापौर होते. परंतु, मिसाबंदी होऊन ते 19 महिने तुरुंगात गेले. आणीबाणी गेल्यानंतर केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. महाराष्ट्रात शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला होता.

भवानीपेठेतून विधानसभेत पोहोचलेले भाई पुलोद सरकारमध्ये गृहखात्याचे राज्यमंत्री झाले. त्या काळात पोलिसांना हाफ पॅन्ट होत्या. भाईंनी सर्वात पहिला निर्णय काय घेतला असेल? तर तो म्हणजे पोलिसांची त्यांनी हाफपॅन्ट काढून फुलपॅन्ट दिली. पोलीस खात्याला त्यांनी प्रतिष्ठा दिली, त्यांना लोकांमध्ये आणले त्यांना अधिकारही दिले. इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) मंडल आयोग लागू करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाईंनी केली होती. आज मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे. परंतु, या नामांतराच्या लढ्याची सुरुवातही भाईंनीच करून दिली होती. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे, असे पहिले विधेयक विधीमंडळात भाईंनीच मांडले होते. धार्मिक एकता आणि सामाजिक सलोख्यासाठी भाईंनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचे अर्ध्य दिले. समाजवादी विचारांचा राजकीय पर्याय देशात उभा करावा म्हणून जे काही अगणित प्रयोग झालेत, त्या सर्व प्रयोगात भाईंनी सकारात्मक विचारांनी सहभाग नोंदवला. मूल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते, याचा मानदंड त्यांनी निर्माण केला, त्यानुसार ते स्वतः वावरले, जगले. गांधीवाद असो, की नक्षलवाद. आंबेडकरवाद असो की कम्युनिस्ट; या सर्वांनी लोकशाही समाजवादी विचाराच्या किमान समान कार्यक्रमावर एकत्र यावे, असा भाईंचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मोदी सरकारमुळे त्यांना आपल्या या उद्दिष्टापासून देश भरकटत जाण्याची भीती वाटत होती. नजीकच्या काळात ही भीती खरे होते की काय? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शेवटी ते शिक्षणाच्या प्रश्‍नावर बोलले, शरीर थकले होते तरी त्यांचे दौरे थांबले नव्हते. समाजवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना शिबिरांमधून ते मार्गदर्शन करतच होते. सरकारविरोधातही ते भूमिका मांडतच होते. सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत सर्वांशी ते बोलत होते. विचार देत होते मार्गदर्शनही करत होते. काल अखेर हा धगधगता यज्ञकुंड थंडावला आहे. भाईंच्या निधनाने लोकशाही मूल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे, उपेक्षित, कष्टकरी यांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे नेतृत्व आता हरपले आहे. समाजवादी चळवळीचा आधारवड उन्मळला आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास ईश्‍वर शांतता प्रदान करो, या प्रार्थनेसह!