पुणे । महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. या विभागाचे काम झेपत नसेल तर विभाग प्रमुख संजय रांजणे यांना पदमुक्त करून त्यांचा पदभार सक्षम अधिकार्याकडे देण्यात यावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. या विभागाकडून राबविण्यात येणार्या योजनांचा आढावा घेण्यासाठी तसेच नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय गटनेते, महापालिका आयुक्त आणि नागरवस्ती विभागाकडील अधिकार्यांची बैठक बोलवण्यात यावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी सर्वसाधारण सभेत दिले. नागरवस्ती विकास योजनेच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही. यासंदर्भात माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. पैसे अपुरे असून प्रशासनाने त्वरीत वर्गीकरण मंजूर करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. निवडणुकांच्या अगोदर अंध, अपंग, विधवा यांच्यासाठी राबवण्यात येणार्या योजनांसाठी अर्ज भरून घेण्यात आले आहे. त्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही, हे धनकवडे यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.
भरतीमध्ये गैरव्यवहार?
प्रशासनानला योजनांची अंलबजावणी करता येत नसेल, तर हा विभागाच बंद करावा, असे महेंद्र पठारे यांनी सांगितले. समुहसंघटिका आणि कार्यालयीन सहायक भरतीमध्ये गैरव्यवहार झाला आहे, असे आरती कोंढरे म्हणाल्या. नागरवस्ती विभागाने रोजगारांसाठी मेळावे आयोजित करण्यापेक्षा, आहे त्यांनाच नोकर्या व्यवस्थित द्याव्यात, तर प्रशासनाने सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
अधिकार्यांची आज सभा
अनेक नगरसेवकांनी नागरवस्ती विभागाच्या कामावर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे एकंदर नगरसेवकांच्या भावना पाहता विभागाचे कामकाज असमाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व पक्षीय गटनेते अधिकारी यांची एकत्रित बैठक शुक्रवारी घेण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.