पुणे । गुण्यागोविंदाने संसार केलेले श्रावण वाघमारे (वय 88) व कमळाबाई वाघमारे (वय 83) या दांपत्याने आपल्या वैवाहिक जीवनाची 75 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. वाघमारे यांचा मंगळवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या परिवाराने कौटुंबिक सोहळ्यात या दाम्पत्याचा सत्कार करण्याचे योजिले आहे.वडगाव बुद्रुक येथे गोसावी वस्तीत वाघमारे कुटुंब एकत्र रहाते. विवाहित कन्या, 6 कर्तबगार मुले, 6 सुना, 13 नातू, 6 नाती व 19 पतवंडे असा वाघमारे यांचा परिवार आहे. कर्तेपणा निभावणार्या श्रावण वाघमारे यांचे 50 जणांचे कुटुंब एकत्रपणे राहाते.
श्रावण वाघमारे हे जन्मापासून माळकरी असून मारुती मंदिरातील पंतांकडून बिगारीपर्यंत शिक्षण घेतले असे सांगतात. भजन-किर्तनाची आवड असल्याने चांगले संस्कार झाले, असे वाघमारे दांपत्याचे मत आहे. ही संस्काराची शिदोरी त्यांनी पुढच्या पिढीला शिकवली आहे. ‘चांगले विचार व आचरण यात तफावत म्हणजे स्वत:ची फसवणूक होय’, असे त्यांचे सांगणे आहे.
साधी रहाणी आणि प्रात:काळी 5 किलोमीटर मोकळ्या हवेत फिरणे, नियमितपणा व शाकाहार हे निरोगी आयुष्याचे सूत्र आहे, ते कसोशीने आजही त्यांच्याकडून पाळले जाते. रामकृष्ण हरी हा त्यांचा मंत्र आहे. परमेश्वराने असेच हिंडते फिरते ठेवावे, दिवसभर कैक प्रश्न विचारणार्या बालगोपालांमध्ये रमावे, अशी त्यांची प्रार्थना आहे. तरुणपिढीने कमीत कमी गरजा ठेवून मानवतावादी दृष्टिकोन ठेवावा असा वाघमारे यांचा सल्ला आहे.हे दांपत्य अशिक्षित आहे; पण निग्रहाने त्यांनी मुलांना शिक्षित केले. एक आदर्श घालून दिला. सध्याच्या काळात हे दांपत्य मार्गदर्शक आहे. कौटुंबिक संवाद साधून भावनिक आधार देणार्या वाघमारे दांपत्याचे वेगळेपण समाजस्वास्थ्य राखणारे आहे.