समाजातील अनिष्ठ प्रथांवर बंदी

0

जळगाव । श्री काथार युवा वाणी समाज सेवा संघातर्फे आयोजित पहिले अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनात समाजाच्या विविध अनिष्ठ प्रथांवर बंदी घालणार्‍या 21 ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मुलीला जन्म देणार्‍या माता-पित्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ़ सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, भवानी मंदिर गादीपती महेश त्रिपाठी यांच्यासह नारायण वाणी, नंदकिशोर कमलाकर, मिलींद वाणी, प्रमोद वाणी, सिताराम चौधरी, विनायक पाराशर, निवृत्ती गणभाटे, ज्योती कासार, योगिता पंडित, शरद वाणी, चंद्रशेखर वाणी, जनार्धन वाणी, आदी उपस्थित होते़

250 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
आ़ सुरेश भोळे यांच्याहस्ते संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी श्री काथार वाणी समाजाच्या सुचीचे प्रकाशन करण्यात आले़ पहिली ते नववीच्या 250 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सुरत, औरंगाबाद, नाशिक, पुणे यासह भारतभरातून 1200 समाजबांधवांची उपस्थिती होती.

अधिवेशात मंजूर ठराव
श्री काथार वाणी समाज सेवा संघातर्फे जळगाव येथे अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशन सरदार वल्लभभाई पटेल, लेवा भवन येथे आयोजन करण्यात आले होते़ या अधिवेशनात समाजातील अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यासाठी 21 ठराव करण्यात आले़ या ठरावांना सर्वानुमते मंजुरी मिळाली असून यात लग्न वेळेवर लावणे, हुंडा बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, लग्नात इतर खर्च टाळणे, समाजातील महिलांनी लग्नाच्या वरातीमधील नाच बंद करणे, पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने लग्न पत्रिकांच्या कागद वाचविण्याकरीता व्हॉटस्पवरील पत्रिका स्विकारणे आदी ठराव करण्यात आले आहेत़

व्यवसायाभिमुख समाज वाढवा
जीवनात जगतांना केवळ पैसा कमवू नये तर पैश्यांसोबत सामाजिक बांधिलकीदेखील जपण्याची आवश्यकता आहे़ उपवर मुलींकडून लग्नासाठी शासकीय नोकरी असलेल्या मुलगा पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु, यामुळे समाज व्यवसायात मागे पडत चालला आहे़ व्यवसायाभिमूख समाज वाढला पाहिजे म्हणून मुलींनी व्यवसाय करणार्‍या मुलांना लग्नासाठी प्राधान्य दिले पाहिजे, असे मत आ़ सुरेश भोळे यांनी व्यक्त केले़

यांनी पाहिले कामकाज
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष उदय वाणी, समिती अध्यक्ष रवींद्र वाणी, उपाध्यक्ष राजेश वाणी, सचिव सुनील वाणी, माजी अध्यक्ष योगेश वाणी, अजय कामळस्कर, प्रा़ अमोल वाणी, मनीष वाणी, धर्मराज वाणी तसेच कार्यकारिणी सदस्य अनंत वाणी, शंकर वाणी, गणेश डाळवाले, प्रशांत वाणी, मनीष वाणी, डॉ़ रवींद्र नांदेडकर, सुधाकर वाणी आदींनी परिश्रम घेतले.