समाजातील ढासळत चाललेली नैतिकता हेच हिंसाचार वाढीचे मूळ कारण

0

जळगाव । सद्यपरिस्थितीत समाजातील ढासळत चाललेली नैतिकता हे हिंसाचारवाढीचे मुख्य कारण असून सोबत टीव्ही, समाजमाध्यमांचा वाढता वापर, एकतर्फी प्रेम, राजकारण, धर्माचा अविवेकी वापर, वाढती व्यसनाधिनता, तसेच दारिद्य्रामुळेदेखील हिंसाचार वाढतोय. माणूस माणसांपासून दुरावतोय. ही समस्या सोडविण्यासाठी संवाद आवश्यक असून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संज्ञापन कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणार्‍या बदलांचा स्विकार करुन आपण वाणिज्य, व्यापार उद्योग आदी क्षेत्रात यश संपादन करु शकतो असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले. ज.जि.मराठा विद्या प्रसारक सह.संस्था संचलित नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंसाचार आणि युवक तसेच सद्यपरिस्थितीतील संज्ञापनातील कल’ या दोन राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्येष्ठ संचालक मनोहर पाटील, किरण साळुंखे, प्राचार्य डी.पी.पवार, मानसशास्त्राचे ज्येष्ठ प्रा.डॉ.डी.एस.जनबंधू, प्रा.डॉ.विवेक काटदरे याप्रसंगी उपस्थित होते.

यांनी केले मार्गदर्शन
प्रारंभी प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. संचालक किरण साळुंखे यांनी संस्थेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथींचा परिचय उपप्राचार्य डी.पी.पवार यांनी केला. उद्घाटन सोहळ्यानंतर प्रा.डॉ.विवेक काटदरे यांनी कंटेप्मररी कम्युनिकेशन स्कील्स या विषयावर बीजभाषण केले. तर मानसशास्त्र परिषदेत नागपूर येथील प्रा.डॉ.डी.एस.जनबंधू यांचे बीजभाषण झाले. आभार प्रा.विजय पवार यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.विजय पालवे यांनी केले. दुपारच्या सत्रात वाणिज्य परिषदेत सी.ए.प्रा.यशवंत सैंदाणे, प्रा.सुरेखा पालवे यांनी विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
मानसशास्त्र परिषदेत एकूण 31 तर वाणिज्य परिषदेत 18 शोधनिबंध सादर झाले. दोन्ही परिषदेत पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली. परिषदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून संशोधक, प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.दोन्ही परिषद यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डी.पी.पवार, प्रा.डॉ.एस.डी.पाटील, प्रा.आर.बी.देशमुख, प्रा.विजय पवार, प्रा.डॉ.जयश्री सोनटक्के, प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.पी.आर.बागुल, प्रा.सुनिल गरुड, मधुकर पवार, निलेश जगदाळे, प्रा.भारुडे, प्रा.प्रशांत पालवे, प्रा.डी.आर.चव्हाण, प्रा.योगेश पाटील, अश्‍विनी मुंदडा, प्रा.धोबी आदींनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप झाला.