येरवडा : शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या योजना तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र इमारत व इतरबांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांनी व्यक्त केला. संतुलन संस्था येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी संतुलनचे अॅड. बस्तू रेगे, अॅड. पल्लवी रेगे, कामगार आयुक्त अनिल लाकसवार, अरुण गायकवाड, एस.बी. कोळी, सागर साखरे आदी उपस्थित होते.
मोलमजुरी करणार्या कुटूंबांसाठी 28 योजना
वाघ म्हणाले की, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या कुटुंबासाठी राज्य शासनाच्या वतीने जवळपास 28 योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये बांधकाम क्षेत्रासह, काच वेचणारे व दगडखाणीवर काम करणार्या कामगारांसाठी ही योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. संतुलन संस्थेमधील दगडखाण कामगारासह जवळपास 2 हजार कामगारांनी अर्ज भरल्यामुळे त्यांना ह्या योजनेचा आणखी चांगला लाभ मिळणार आहे. संबंधित योजनेत मुलांच्या शिक्षणापासून ते एखाद्या ठिकाणी असलेल्या कामावर काम करताना एखाद्या कामगाराचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबास योजनेत सहभागी करून त्यांना आर्थिक नुकसान मिळणार असून याबरोबरच कामगारांसाठी घरकुल,विमा,आर्थिक मदत ह्या योजनेमार्फत देण्यात येणार आहे.
संघटनेच्या माध्यमातुन कामगारांना योजनांचा लाभ
अॅड. पल्लवी रेगे म्हणाल्या, वर्षानुवर्षे राज्यात शिक्षणापासून वंचित राहिलेले मागासवर्गीय समाजातील अनेक कामगार काम करत आहेत. मात्र त्यांना शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या योजनेची माहिती नसल्याने या कामगारांना योजनेचा कशा पद्धतीने लाभ देता येईल यासाठी संतुलन व दगडखाण कामगार संघटना कामगारांच्या माध्यमातून उभारल्यामुळे अनेक कामगार शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या योजनेचा लाभ घेत आहेत.