माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची अपेक्षा
पिंपरी-चिंचवड : ‘आजच्या गतिमान युगामध्ये संशोधनाची संस्कृती वेगवान झाली आहे. मुलभूत आणि उपयोजित संशोधनातील अंतर आज झपाट्याने कमी होत चालले आहे. संशोधकांनी या दृष्टीने आपले संशोधन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कसे परिणामकारक ठरेल याकडे लक्ष द्यावे. आपल्या विषयांच्या सीमारेषा ओलांडून विविध विद्याशाखांच्या संशोधकांनी एकत्र येऊन कृषी, हवामान, प्रदूषण यांसारख्या अनेक प्रश्नांवर एकत्रितपणे संशोधन करावे यातूनच उज्वल भविष्याची आपण आशा करू शकतो’, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन.जे.पवार यांनी व्यक्त केली.डॉ. डी.वाय.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि मायक्रोबायोलोजी सोसायटी ऑफ इंडिया आयोजीत ‘मायक्रोबायोलोजी टेक्नोलॉजी फॉर बेटर टूमारो’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्मरणिकेचे प्रकाशन
डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि संस्थेच्या विश्वस्त डॉ. स्मिता जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही तीन दिवसीय परिषद (17-19 फेब्रुवारी) भरविण्यात आली आहे. डॉ. पी.डी.पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, मायक्रोबायोलोजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ. रणजीत पाटील, गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर, परिषदेच्या समन्वयक डॉ. मानसी कुर्तकोटी, कार्यालयीन अधीक्षक गायकवाड आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. उद्घाटन समयी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
350 संशोधक सहभागी
दुबई, बांगलादेश, नेपाळ आदी देशातून तसेच महाराष्ट्र राज्य, कर्नाटक, गोवा, गुजरात, झारखंड, उत्तरप्रदेश, दिल्ली या ठिकाणांहून सुमारे 350 संशोधक, शिक्षक, विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले आहेत. एकूण 175 संशोधनपर निबधांचे सादरीकरण येथे होणार आहे. डॉ. नीरु सूद, डॉ. तृप्ती दामले, डॉ. पी. पी. गोस्वामी, डॉ. बी. के. गोस्वामी, डॉ. अनिता कार, डॉ. दीप्ती देवबागकर, डॉ. उपेंद्र जानी या विविध संस्थांमधील मान्यवर तज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिमा चव्हाण यांनी केले. डॉ. कुर्तकोटी यांनी आभार मानले.