समाजासाठी काहीतरी करणार्‍यांचाच गौरव होतो 

0
महापौर जाधव यांचे प्रतिपादन
चिंचवड : समाजासाठी काहीतरी करणारांचाच गौरव होतो, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. थेरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, नगरसेविका माया बारणे, नगरसेविका करुणा चिंचवडे, कीर्तनकार जयश्री येवले, रोटरी ÷अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, उद्योजक प्रकाश काचळे, ज्योतीष मार्गदर्शक नवनीत गांधी, थेरगाव सोशल फाऊंडेशन यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी महापौर जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे होते. माजी उपमहापौर झामाबाई बारणे, शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे, प्रतिष्ठानचे संस्थापक हरिश मोरे, अध्यक्ष दीपक पारखी उपस्थित होते.
प्रोत्साहन देणे गरजेचे 
खासदार बारणे म्हणाले की, प्रपंचाचा गाडा चालवत असताना समाजाप्रती चांगले काम करणार्‍यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर एक सिद्धहस्त लेखणी असलेला निर्भीड पत्रकार आहे. त्याची अनेकांशी मैत्री असली तरी तो लिहिताना कोणाचाच मुलाहिजा ठेवत नाही. त्यांच्यासारख्या पत्रकारांचा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे. माया बारणे म्हणाल्या की, नगरसेवकांनी आपल्या भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन काम केले पाहिजे. पत्रकार सातुर्डेकर म्हणाले की, तत्वांशी बांधिलकी ठेवत जेव्हा आपण संघर्षमयी जीवन जगतो. तेव्हा आत्मविश्‍वासाने, ताठ मानेने, स्वाभिमानाने जगण्यात असलेला आनंद आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. गेली 32 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करताना मी हाच आनंद मिळवला आहे.