समाज मनावर समानतेचे संस्कार होणे गरजेचे – डॉ. बेरी

0

आकुर्डी (प्रतिनिधी) स्ञी पुरुष विषमता आजही समाजात टिकून आहे. म्हणूनच हुंडा पद्धती चालू आहे. या विषमतेला आपल्या घरापासूनच सुरुवात होते. मुलीला मर्यादाशील राहा अशी शिकवण दिली जाते. पण मुलाला माञ बाहेरच्या मुलीला सन्मानाची वागणूक दे तिच्या सुरक्षितेसाठी पुढाकार घे अशी शिकवण दिली जात नाही. यातूनच स्ञी पुरुष विषमतेचे वातावरण सुरु होते. त्यामुळे आजही हुंडा प्रतिबंधक कायदा होऊन 56 वर्षे झाली तरी हुंड्यामुळे मुलींना होणारा ञास व हुंडाबळी हे सुरुच आहे, असे मत डॉ. सुरेश बेरी यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय कला वाणिज्य, विज्ञान, मराठी विभाग व स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने स्ञी पुरुष समानता व हुंडा एक सामाजिक समस्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. बेरी बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, स्वयंसिध्दा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे, मानस समुपदेशक नूतन शेटे, कायदे सल्लागार मनीषा महाजन , सामाजिक कार्यकर्त्या उल्का चिंचोरे, मराठी विभागप्रमुख अपर्णा पांडे, सुरेश कंक, सुप्रिया सोळांकुरे, सुभाष चव्हाण, माधुरी विधाटे, स्नेहा इंगळे आदी उपस्थित होते.

स्त्री स्वयंसिद्ध आहे
डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, विद्यार्थांसाठी असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी हे महाविद्यालय नेहमी अग्रेसर असते. विद्यार्थ्यांनी अशा परिसंवादातून बोध घेतला पाहिजे. हुंडा देण्याघेण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत. उल्का चिंचोरे म्हणाल्या की, आजची स्ञी ही अन्न वस्ञ निवारा या मुलभूत गोष्टींच्या मागे न लागता ती एक स्वयंसिद्ध बनली आहे. पण तिच्या नशिबी आजही समाजात उपेक्षा मिळत आहे. ग्रामीण तसेच शहरातील स्त्री- पुरुष असमानता दूर करायला हवी, महिलांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.

समाज परिवर्तानाची लाट
अ‍ॅड. मनीषा महाजन म्हणाल्या की, हुंदविरोधी कायदा 1961 मध्ये आला आता समाजात परिवर्तनाची लाट आली पाहिजे. सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याची मानसिकता वाढली पाहिजे. यावेळी निलिमा फाटक, अय्याज शेख, चिनू चितोडिया, ऋत्वीजा जाधव, राधा ननावरे या आणि इतर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. कार्यक्रम संयोजनास दिनेश भोसले, डॉ. संगिता लांडगे, नंदकुमार मुरडे व वर्षा बालगोपाल यांनी सहकार्य केले. यावेळी मनिषा पाटील यांनी विद्यार्थ्यांना हुंडा घेणार नाही आणि देणार नाही अशी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अपर्णा पांडे यांनी केले, सुत्रसंचालन सविता इंगळे यांनी तर आभार डॉ. धनंजय वाघमारे यांनी केले.