नगरसेवक डोळस यांनी अधिकार्यांना घेतले फैलावर
पिंपरी-चिंचवड : समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी देऊनही ती कामे रखडली आहेत. अधिका-यांनी जाणीवपूर्वक ही कामे रखडविली आहेत. अधिका-यांनी शहरातील विकासाची कामे करणे अपेक्षित आहे, राजकारण नव्हे, असा हल्लाबोल करत भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांनी अधिकार्यांना स्थायीच्या सभेत चांगलेच फैलावर घेतले.
केबल, वायर खरेदी प्रस्ताव तहकुब
विद्युत विभागासाठी विविध प्रकारचे केबल्स आणि वायर्स साहित्य खरेदीला दोन कोटी 88 लाख 61 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावर बोलताना नगरसेवक विकास डोळस म्हणाले, समाविष्ट गावातील रस्ते कामांमध्येच विद्युतची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. या कामांना स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. परंतु, विद्युत विभागाने विद्युतच्या कामासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविल्यास 15 ते 20 टक्के कमी दराने निविदा येतात, असे पत्र दिले आहे. त्यामुळे आयुक्तांनी रस्ते विकासाच्या कामाच्या फाईलवर स्वाक्षरी केली नाही. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून समाविष्ट गावातील रस्ते विकासाची कामे रखडली आहेत. केबल्स आणि वायर्स खरेदीचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी डोळस यांनी केली. त्यानंतर हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला आहे.