समुद्राच्या पोटातील खजिना भारतीय भूगर्भशास्त्रज्ञांनी शोधला

0

नवी दिल्ली । असे म्हटले जाते की, समुद्राच्या पोटात खूप काही दडलं आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी याचाच शोध लावला आहे. भारतीय भूगर्भशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांना देशाच्या आसपास असलेल्या सागरी भागात लाखो टन धातू आणि खनिजे असल्याचा शोध लावला आहे. चेन्नई, अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप जवळील भागांमध्ये भूगर्भशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांना नैसर्गिक संसाधने असल्याचे पुरावे आढळले आहेत. जिऑलजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी भारतीय द्विपकल्पीय समुद्रात लाखो टनाचे किंमती धातू आणि खनिज असल्याचा शोध लावला आहे. 2014 च्या सुरुवातीला मंगळुरु, चेन्नई, मन्नार बासिन, अंदमान, निकोबार बेट आणि लक्षद्वीपच्या समुद्रात मोठया प्रमाणावर साधनसंपत्ती असल्याची माहिती मिळाली होती.

तीन वर्षांची शोध मोहीम
भूगर्भ वैज्ञानिकांना शोध घेताना समुद्रात चिखल, फॉसफेट, काँल्शिअम, हायड्रोकार्बन आणि धातूयुक्त घटक आढळले. या वस्तू अतिशय मोठ्या प्रमाणात सापडल्याने या भागात मुबलक नैसर्गिक संसाधने असावीत, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. अधिक खोलवर शोध घेतल्यास मोठया प्रमाणावर साधनसंपत्ती सापडण्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. वैज्ञानिकांचा अंदाज खरा ठरल्यास या भागातून भारताला मोठ्या प्रमाणात संसाधने हाती लागू शकतात. तीन वर्षाच्या शोध मोहिमेनंतर जीएसआयने 1,81,025 चौरस किलोमीटरचा हाय रेजॉल्युशन सीबेड मॉरफोलॉजिकल डेटा तयार केला आहे.

तीन अत्याधुनिक जहाजांची मदत
कारवार, मंगळुरु आणि चेन्नईच्या समुद्रात फॉसफेटचा गाळ असल्याचेही स्पष्ट झाले आहे, अशी माहिती भारतीय भूगर्भशास्त्र संस्थेने दिली आहे. समुद्र रत्नाकर, समुद्र सौदीकामा आणि समुद्र कौस्तूभ या तीन अत्याधुनिक जहाजांच्या मदतीने ही शोध मोहिम राबवण्यात आली. याशिवाय वैज्ञानिकांना तमिळनाडूच्या किनारी भागातील मन्नारजवळ गॅस हायड्रेट आणि अंदमानच्या समुद्राजवळकोबाल्टचे तुकडे आढळून आले आहेत. तर लक्षद्वीपच्या समुद्राजवळ मँगनीज असल्याचे पुरावे सापडले आहेत.