समृद्धी महामार्गाच्या आराखड्याबाबत काही ठिकाणी फेरविचार करा

0

मुंबई – मुंबई ते नागपूर, या समृद्धी महामार्गाच्या आराखड्याबाबत काही ठिकाणी फेरविचार करावा लागेल. नाही तर हा महामार्ग होणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. तसे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारीच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गासाठी जमीन खरेदी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या महामार्गात शेतकऱ्यांसोबत असण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला. काही दिवसांपूर्वीच या महामार्गाला जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी आपण शेतकऱ्यांबरोबर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवसेना व मंत्री वेगवेगळी भूमिका घेत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे घाईघाईने बोलाविलेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी दोघांची भूमिका एकच आहे, असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते.

आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत. जे शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळतो की नाही. त्याचप्रमाणे सुपिक जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देताना पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी शिवसेना आग्रह धरणार. सुपिक जमीन वाचवण्याचा प्रयत्न करणार, असेही ठाकरे यांनी सांगितले.