समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत 100 शेतकर्‍यांवर गुन्हे?

0

ठाणे । मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठीच्या भू-संपादनावरून राज्य सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. भू-संपादनला विरोध करणार्‍या शेकडो शेतकर्‍यांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) यशस्वीरित्या 90 टक्के जमिनीची संयुक्त मोजणी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण याचवेळी संयुक्त मोजणीला विरोध करणार्‍या शंभरहून अधिक शेतकार्‍यांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकरी, विविध ठिकाणच्या संघर्ष कृती समित्यांनी दिली आहे.

जमिनीसाठी शेतकर्‍यांना धमक्या?
शेतकर्‍यांना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर पाय ठेवण्यासाठी सरकारकडून रोखले जात आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. हे सरकार एवढ्यावरच थांबले नसून जमिनीचा बळजबरीने ताबा मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना धमकावले जात आहे, असा आरोप समृद्धी महामार्ग संघर्ष समितीचे संयोजक बबन हर्णे यांनी केला आहे. एमएसआरडीसीच्या संयुक्त मोजणीला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या समितीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 85 शेतकर्‍यांवर गुन्ह्याची नोंद केली आहे. स्वत:च्या मालकीच्या जमिनीची संयुक्त मोजणी केल्याच्या विरोधात शेतकर्‍यांवर अशी बळजबरीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. आतापर्यंत एकूण 250 शेतकर्‍यांना कायदेशीर नोटिसा धाडण्यात आल्या असून या सर्वांना प्रकल्पाच्या विरोधातील कोणत्याही निषेध मोर्चात सहभागी होण्यापासून रोखले आहे.

दरम्यान, पोलिसांनी मात्र कारवाई करण्यात आलेल्यांचा आकडा फुगवून दाखवला जात असल्याचे म्हटले आहे. ठाण्यात केवळ चार शेतकर्‍यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून बेकायदेशीर कृतीत सहभागी असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी दिली. शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीवर जाण्यापासून आम्ही अजिबात रोखलेले नाही, पण काही जण कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करत असल्याने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागली, असं महेश पाटील यांनी सांगितले आहे.