पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – समृद्ध जीवन कंपनीने हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे तात्काळ मिळवून देण्याकरिता प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सर्व गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष धनेश चट्टे पाटील, आरती दातार, विजय शेंडगे, रुपेश माळी, अतुल बडगुजर, दत्तात्रय येवले, संजय इरोळे, बालाजी चांदोरे, लतिफ माहूत, शशिकांत ओव्हाळ, भीमराव ढोणे आदींचा समावेश होता.
हजारो कोटींचा घोटाळा
शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, समृद्ध जीवन कंपनीचे प्रमुख महेश किसन मोतेवार यांनी देशातील 21 राज्यांमधून 600 पेक्षा अधिक शाखा व लाखो एजंटांच्या माध्यमातून गोर-गरीब व सामान्य जनतेकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. या कंपनीने सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक करत हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. यासंदर्भात सेबी अॅपीलेट ट्रिब्युनल मुंबई व सेंट्रल रजिस्ट्रार नवी दिल्ली यांनी गुंतवणूकदारांच्या बाजूने निकाल देत गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत करण्याबाबत कंपनीला सांगितले.
प्रोग्रेसिव्ह असोसिएशनचा पाठपुरावा
तत्पूर्वी प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनने संबंधित विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदने सादर केली होती. त्यामध्ये समृद्ध जीवन समूहाच्या व कंपनी संचालकांच्या मालमत्ता शासनाने जप्त करून ताब्यात घ्याव्यात, असे सांगण्यात आले होते. तसेच समृद्ध जीवन समूहाचे संचालक मंडळ कंपनी मालकीच्या मालमत्तांची परस्पर विक्री करीत असल्याचे व नागरिकांना आणखी प्रलोभने दाखवून आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनने वेळोवेळी केली असून त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने गृहराज्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
पैसे लवकरात लवकर मिळवून देऊ
याबाबत बोलताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले की, समृद्ध जीवन कंपनी व सहकंपनीच्या सर्व संचालकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात येईल. पुढील आठवड्यात प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकारी व शिष्टमंडळ आणि संबंधित अधिका-यांशी चर्चा करून या प्रश्नावर लवकरात लवकर सुनावणी करू. सर्व गुंतवणूकदारांचे पैसे शक्य तेवढ्या लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे पाटील यांनी आश्वासन दिले. मागील काही महिन्यापूर्वी यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समृद्ध जीवन कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देणार. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तरी देखील तो करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.