भुसावळ। वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असतांना आईवडिलांचा समृद्ध वारसा जोपासून संवेदनशील मनाचा आधार घेत आपल्या अनुभवांची शब्दबद्ध रचना करण्याचे काम भूलतज्ञ डॉ.मिलींद धांडे यांनी केले आहे. मागे वळून पाहता या त्यांच्या काव्यसंग्रहातील कविता मनाचा वेध घेणार्या असून वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्य वाचकांसाठी हृदस्पर्शी ठरणार्या आहेत, असे प्रतिपादन डॉ.जगदीश पाटील यांनी येथे केले.
काव्य निमिर्तीची भुमिका स्पष्ट
भुसावळ येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ.मिलींद धांडे लिखित मागे पाहता वळून या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रोफेसर कॉलनीतील डॉ.धांडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले. अध्यक्षस्थानी अस्थिरोगतज्ञ डॉ.तुषार पाटील होते. प्रमुख वक्ते डॉ.जगदीश पाटील तर प्रमुख पाहुणे मैफल प्रकाशनचे प्रकाशक निर्मोही काशिनाथ भारंबे होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ.मिलींद धांडे यांचे वडिल सेवानिवृत्त पर्यवेक्षक यादव धांडे व आई डॉ.लतिका धांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ऋचा धांडे हिने प्रास्ताविक केले. कवी डॉ.मिलींद धांडे यांनी काव्य निर्मितीमागची भूमिका स्पष्ट करुन मनातील भावनांना काव्याद्वारे मांडल्याचे सांगितले.
आध्यात्मवादी कविता
काशिनाथ भारंबे यांनी डॉ.धांडे यांच्या कविता सहज आकलन होतील अशा असून त्या समाज जागृतीपर आहेत. त्यांना ठाम विचारांची बैठक असून त्यात कुटुंबाच्या भावना जोपासल्या आहेत. त्यात गद्यता व रटाळपणा नसून कविता सकस व अर्थपूर्ण असल्याने वाचकालाही भूल पाडणार्या असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.जगदीश पाटील यांनी आपल्या मनोगतात भारतीय साहित्य शास्त्रातील काव्याची लक्षणे व प्रयोजने सांगितली. डॉ.धांडे यांनी आपल्या कवितांमध्ये प्रेम, पर्यावरण, कुटुंब, संतसाहित्य, वैद्यकीय असे नानाविध विषय हाताळून वैद्यकशास्त्र व साहित्यशास्त्राची सुरेख सांगड घातली असल्याचे आपल्या मनोगतात नमूद केले. भरत बर्हाटे यांनी डॉ.धांडे यांच्या कविता अध्यात्मवादी असून वाचकांना प्रेरणादायी ठरतील असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.राजश्री देशमुख यांनी तर आभार डॉ.तनुजा धांडे यांनी मानले.