‘समृध्दी’ला 50 गावांचा विरोध

0

नाशिक। सिन्नर तालुक्यातील शिवडे गावानंतर आता समृद्ध महामार्गाविरोधातील आंदोलनाचे लोण अन्य जिल्ह्यांमध्येही पोहचले आहे. दहा जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गावांनी समृद्धी महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. या दहा जिल्ह्यातील 50 हून अधिक गावांमधील शेतकरी प्रतिनिधींची बैठक शनिवारी शिवडे गावात झाली. ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह 10 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तीन महामार्ग असूनही ‘समृध्दी’ कुणासाठी?
कुठल्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गासाठी सुपीक जमिनी द्यायच्या नाहीत, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. समृद्धी महामार्गविरोधी आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह दहा जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले आहेत. मुंबईहून औरंगाबादला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह तीन मोठे महामार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा विकास करण्याऐवजी हजारो शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या समृद्धी महामार्गाचा घाट का घातला जातो आहे, असा सवाल या समितीनें केला आहे. 26 एप्रिलला शहापूर येथे या दहाही जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन जनआंदोलन करणार आहेत. त्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले. या बैठकीच्या दरम्यान राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला.