मुंबई- स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची केवळ घोषणा करून ते सुरुवात करण्याआधीच गुंडाळणे हा केवळ राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर स्व. गोपीनाथराव मुंडेंचाही सरकारने अवमान केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्व. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र ऊसतोड कामगार व तत्सम श्रमजीवी कामगार मंडळाची घोषणा केली होती. मंडळाचे मुख्यालय परळी (जि. बीड) येथे ठेवण्याचे ठरले. ऑगस्ट २०१७ मध्ये मंडळ स्थापन झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची केवळ घोषणा करून ते सुरुवात करण्याआधीच गुंडाळणे हा केवळ राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचाही सरकारने अवमान केला आहे. pic.twitter.com/lcdvRHsGLF
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 11, 2018
ऊसतोड कामगारांच्या तोंडाला पाने पुसली
या मंडळातून राज्यातील ऊसतोडणी मजुरांना लाभ मिळवून देण्याचा उद्देश होता. परंतु, हे कामगार मंडळ प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीच गुंडाळून ठेवण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले. त्याच आधारे धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या निर्णयाचा राज्यातील आठ लाख ऊसतोड कामगारांना फटका बसणार आहे. सरकारने गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हा ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर स्व. गोपीनाथ मुंडे यांचाच हा अवमान असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवर केला आहे.
दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे कामकाज पुढे न चालवता मुंडे यांच्याच नावे ऊसतोड कामगारांसाठी ‘सामाजिक सुरक्षा योजना’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.