सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत मोठी तफावत – अजित पवार

0

पुणे : देशात सध्या फसवाफसवी आणि बनवाबनवी सुरू असून आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत मोठी तफावत आहे अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कारांचे अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, सभापती राणी शेळके आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘बेटी बचाव व बेटी बढाव’ कार्यक्रमांतर्गत गुड्डा-गुड्डी फलकाचे अनावरणही करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीच्या वेळेस अंगणवाडी सेविकांना किमान दररोज साडेतीनशे रुपये मानधन देऊ, अशी घोषणा भाजपाच्या वतीने करण्यात आली होती. आता सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली, मात्र या घोषणेचा सरकारला विसर पडला आहे. राज्यात २ लाख सेविका आहेत. त्यांना १८ हजार रुपये मानधन मिळालाय हवे. तेलंगणा, केरळमध्ये अंगणवाडी सेविकांना १० हजार, हरियाणामध्ये ८ हजार रुपये मानधन मिळते. मग, महाराष्ट्रात द्यायला काय हरकत आहे? मानधन वाढविणे सोडाच; पण आपल्या हक्काच्या मानधनासाठी संप पुकारणाऱ्या सेविकांवर मेस्मा कायद्याचा बडगा सरकारने उगारला. अवघ्या दीड हजाराची वाढ करून सेविकांची बोळवण सरकारने केली. असे पवार यांनी म्हंटले. सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे. जनता सुज्ञ आहे. यामुळे पुढच्या वर्षी परिस्थिती वेगळी असणार आहे. अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला वाचा फोडणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सांगून विधान परिषदेत लक्षवेधीमध्ये सेविकांचे प्रश्न मांडण्यात येतील. असेही पवार यांनी सांगितलं.