मुख्यमंत्र्यांची पसंदी शिंदेंना, सेनेला मात्र देसाईच हवेत
मुंबई:- सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा जरी शिवसेनेकडून बोलली जात असली तरी सत्तेचा मोह सुटायला तयार नाही. राणे यांना मंत्रीमंडळात घेण्यावरून युती सरकारमध्ये आधी पेच उभा राहिला होता. राणे यांना मंत्रिमंडळात घ्यायचे असल्यास आम्हाला उपमुख्यमंत्री द्या, ही सेनेची मागणी होती. ती फडणवीस यांनी मान्य केली, पण ही मागणी पूर्ण करताना मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या नावाला प्राधान्य दिले. सेना मात्र वरिष्ठ नेते देसाई यांच्या नावासाठी आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री पदावरून तिढा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे की सुभाष देसाई असा हा तिढा असून मुख्यमंत्री फडणवीस यांची शिंदे यांना पसंदी असून सेनेला मात्र देसाई हवे आहेत. हा तिढा निर्माण होण्याचे मुख्य कारण माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच ठरत आहेत.
सेनेच्या मंत्र्यांपैकी शिंदे हे फडणवीस यांचे सर्वांत लाडके मंत्री आहेत. शिंदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (उपक्रम वगळून) कामावर ते खुश असून त्यांना सर्व प्रकारची मुभा त्यांनी दिली आहे. सेनेकडे असलेल्या उद्योग, पर्यावरण, परिवहन, आरोग्य या खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा जसा हस्तक्षेप असतो, तसा ते शिंदेंच्या खात्यात करताना कधीच दिसले नाहीत. समृद्धी महामार्ग या फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात शिंदे यांना त्यांनी समाविष्ट केले आहे. खास बात म्हणजे जमीन अधिग्रहणाची अनेक प्रकरणे सोडण्यासाठी फडणवीस यांनी शिंदेंवर जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती खुबीने सोडवल्यामुळे मुख्यमंत्री शिंदेशाहीवर खूप खुश असल्याचे समजते.
शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यास आपल्याला काही अडचण येणार नाही. पण देसाईंचे तसे नाही. ते प्रत्येक निर्णय मातोश्रीशी सल्लामसलत केल्याशिवाय घेणार नाहीत आणि ते आपल्याला अडचणीचे ठरतील, असा त्यांचा कयास आहे. तर राणेंमुळे हात पोळून घेतलेल्या सेनेने यापुढे कुठल्याही नेत्याला फार मोठे करायचे नाही, असे ठरवले आहे. या घडीला सेनेत सर्वात प्रभावी नेता म्हणून शिंदे यांचे नाव घेतले जाते. सेनेच्या आमदारांचाही मोठा गटही त्यांच्यामागे आहे. शिंदेंना उपमुख्यमंत्री केल्यास ते भविष्यात डोईजड होतील, ही भीती मातोश्रीला सतावत आहे.