सरकारमध्ये मला मरू देण्याची हिंमत नाही

0

अण्णा हजारे यांचा उपोषणाचा निर्धार कायम
वेगळ्यास्वरूपाचे आंदोलन करण्याचे ग्रामस्थांचे आवाहन नाकारले

अहमदनगर : अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी परिवारासह देशाला गरज आहे. अण्णांनी वाढते वय व व्याधींचा विचार करता नवी दिल्ली येथे उपोषण न करता वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करावे, असा भावनिक आग्रह राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी अण्णांकडे धरला. त्यावर उपोषणाने मी मरणार नाही आणि सरकारमध्ये मला मरू देण्याची हिमंत नाही, असे सांगत अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे 23 मार्चपासून उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगितले.

देशात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या
अण्णांच्या दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राळेगणसिद्धी येथे यादवबाबा मंदिरात ग्रामसभा झाली. यावेळी अण्णा हजारे म्हणाले, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने वीस वर्षांत देशात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. राज्यात विदर्भ व मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण जास्त असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा प्रश्‍न दिसून येतो. राज्यात कृषिमूल्य आयोग असून त्याचा अहवाल केंद्राला जातो. राज्य व केंद्राच्या कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र करून स्वायत्तता द्या. त्यावर तज्ज्ञ शेतकर्‍यांची नेमणूक केली पाहिजे. नैसर्गिक संकटात शेतकर्‍यांचा विमा वैयक्तिक स्वरूपाचा काढावा. त्यांना 60 वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळायला हवे.

लोकपालच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केले असून हा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही अण्णांनी केला.
यावेळी सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, गंगाभाऊ मापारी, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, माजी सरपंच जयसिंग मापारी, राजाराम गाजरे, अरूण भालेकर आदींची भाषणे झाली. याप्रसंगी डॉ.गणेश पोटे, माजी सरपंच मंगल मापारी, प्रभावती पठारे, संगीता पठारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. अण्णांच्या नवी दिल्ली येथील उपोषण आंदोलनस्थळी राळेगणसिद्धी परिवारातील सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे व डॉ. धनंजय पोटे आदी उपस्थित राहतील, असा ठराव यावेळी करण्यात आला.