सरकारविरुद्ध ‘असहकार’ची हाक!

0

सरकारचे कुठलेही देणे देऊ नका; जनआक्रोश मोर्चात शरद पवारांचे आवाहन

नागपूर (नीलेश झालटे) : वाढदिवसाच्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जनआक्रोश हल्लाबोल मोर्चात राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल करत, शेतकर्‍यांना सरकारशी असहकार पुकारण्याचे थेट आवाहन केले. आम्ही 2007 साली 15 दिवसांत कर्जमाफी केली असल्याचा दावा करत, पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी पवार म्हणाले, की गेले सहा महिने देवेंद्र फडणवीस सांगत आहेत, की आम्ही कर्जमाफी देणार आहोत; पण कधी देणार? असा सवाल करत शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि हे सरकार सक्तीची वसुली करत आहे. या सरकारने आमच्या शेतमालाला भाव दिला नाही, शेतकरी अडचणीत आहे तरीही वीजबिलाची वसुली केली जातेय, त्यामुळे तुम्ही निर्धार करा, सरकारची कोणतीही देणी देऊ नका, अशा शब्दात पवार यांनी सरकारशी असहकार पुकारण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केले. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित केल्याचेही यावेळी पवार म्हणाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येवून काढलेल्या या विराट मोर्चाने राज्य सरकारचे चांगलेच धाबे दणाणले होते. राज्यभरातून लाखो शेतकरी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री दमदाटी करून सर्वसामान्यांचा आवाज दाबत आहेत!
यावेळी शरद पवार यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या चारित्र्यवान नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपला शरम वाटली पाहिजे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला. मनमोहन सिंग हे चारित्र्यवान नेते आहेत. पाकिस्तानच्या मदतीने गुजरात निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला. निवडणुका जिंकण्यासाठी असे आरोप करणे चुकीचे असून, पाकिस्तानसोबत कारस्थान करत असल्याचा आरोप करताना सरकारला शरम वाटली पाहिजे, असा घणाघातही पवारांनी मोदींवर केला. राज्याचे मुख्यमंत्री त्यांना सवाल केला असता दमदाटी करून सामान्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही जनता तुमची सत्ता उलथवून टाकेल, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्र्यांनी साडेतीन वर्षापूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते, पण त्याकडे ते आता दुर्लक्ष करत आहेत. गेली सहा महिने देवेंद्र फडणवीस सांगत आहेत आम्ही कर्जमाफी देणार आहोत आणि दुसरीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलेही सरकारचे देणे देऊ नका, असेही पवारांनी सांगितले.

दोन्ही काँग्रेसचे नेते मोर्चाच्या निमित्ताने एकत्र
नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील मित्रपक्षांच्यावतीने सरकारचा निषेध करण्यासाठी नागपुरात जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या रस्त्याने निघालेले हे मोर्चे टी-पॉइंटवर एकत्र आले. या मोर्चासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसच्या मोर्चाची सुरुवात दीक्षाभूमीवरून झाली तर राष्ट्रवादीच्या मोर्चाची सुरुवात ही काँग्रेस नगरमधून झाली. या मोर्चाला लाखाच्यावर लोकांची उपस्थिती असल्याचा दावा विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मुख्य नेते बर्‍याच वर्षांनी आंदोलनासाठी एका मंचावर आलेले दिसले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह सर्व आमदार व अनेक खासदार उपस्थित होते.

पंतप्रधान खोटे बोलतात हे आश्चर्यकारक : आझाद
पंतप्रधान हे सर्व देशाचे असतात, मात्र सध्याचे पंतप्रधान हे भाजपचे आहेत. देशात किंवा राज्यात आमदार, खासदार खोटे बोलले तर जास्त फरक पडत नाही; मात्र येथे तर खुद्द पंतप्रधान खोटे बोलत असल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा सवाल करत काँग्रेसचे राज्यसभेचे नेते गुलामनबी आझाद यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. या हल्लाबोल यात्रेचे स्वागत करत त्यांनी हा हल्लाबोल आता केवळ रस्त्यावर, सभागृहातच नाही तर निवडणुकांमधूनदेखील दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. जे या देशातील लोकांना खोटी आश्वासने देतात त्यांना जनता माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये आश्वासन दिले होते की, शेतीसाठी जो खर्च केला जाईल तो खर्च शेतकर्‍यांना दिला जाईल आणि त्यावर आणखी फायदा दिला जाईल. पण आज मोदींच्या सरकारला साडेतीन वर्षे झाली. कुठे गेली त्यांनी दिलेली आश्वासने? शेतकर्‍यांसोबत खोटे बोलणे हा देशाचा अपमान आहे. त्यासाठी त्यांना कधीही माफ केले जाऊ शकत नाही, असेही आझाद यांनी बजावले.

फडणवीसांनी शेतकरी आहे हे सिद्ध करावे : मुंडे
शेतकर्‍यांना कर्जमाफीचे गाजर देऊन लटकत ठेवणारे मुख्यमंत्री मी शेतकरी असल्याचे सांगत आहेत. त्यांनी ते शेतकरी असल्याचे सिद्ध करावे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. मुंडे म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांची बाजू मांडत असताना मुख्यमंत्री सांगत होते मी पाच पिढ्यांच्या शेतकरी आहे. तुम्ही सर्व बाजूने मुख्यमंत्र्यांना बघा ते शेतकरी वाटतात का? मुख्यमंत्री म्हणतात मी गाईचे दूध काढले आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गाय घेऊन जातो मुख्यमंत्र्यांनी दूध काढून दाखवावे, असा टोलाही मुंडेंनी लगावला. मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही 15 वर्षे काय केले. मी म्हणतो तीन वर्षापूर्वी जनतेने तुमचे लग्न सत्तेशी लावले मग तुम्हाला जनकल्याणाचे पोरं होत नाही त्याला आम्ही काय करणार? अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

विधिमंडळाचे कामकाज ठप्प; दुसरा दिवसही गोंधळाचा!
विरोधी पक्षाच्या जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ घातल्याने हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही कामकाज ठप्पच राहिले. विधानसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर वेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करूनही गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. तर विधानपरिषदेतदेखील याच मागणीसाठी विरोधकांच्या गोधळामुळे दुपारीच सभागृह तहकूब केले. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायर्‍यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारविरोधात आंदोलन केले. तर सभागृहात शेतकर्‍यांची कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणत वेलमध्ये गोंधळ सुरु केला. विधानपरिषदेतही शिवसेना-भाजपच्या सदस्यांव्यतिरिक्त सर्व सदस्य सभापतींसमोरील वेलमध्ये येऊन घोषणा करीत होते. सत्ताधार्‍यांच्यावतीने संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी काहीप्रमाणात विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण विरोधकांच्या घोषणा सुरूच राहिल्याने सभागृह पूर्ण दिवसासाठी स्थगित केले गेले.