नवी मुंबई । सरकार जनतेवर करीत असलेल्या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत जुलमी सरकार पायउतार होत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहिल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला. जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या नाकर्त्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने देशभर हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. डॉ.नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बेलापूर येथील कोकण भवन मुख्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. बोल बोल हल्लाबोलची गर्जना करित सरकारविरोधी घोषणांनी कोकण भवनचा परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. डॉ. नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ कोकण विभागीय उपायुक्तांना भेटले आणि त्यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र इथापे, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, जिल्हा युवकअध्यक्ष सुरज पाटील, जिल्हा महिलाअध्यक्षा माधुरी सुतार, जिल्हा सेवादल अध्यक्ष दिनेश पारख, जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जब्बार खान, पलिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद डॉ.जयाजी नाथ आदींनी या आंदोलनात भाग घेतला.
सरकारकडून जाहिरातबाजीवर होतोय करोडो रुपये खर्च
तीन वर्षे जनतेने अच्छे दिनची वाट पाहिली. मात्र, जनता होरपळून निघाली. जनतेचा हा आक्रोश हल्लाबोल आंदोलनातून बाहेर पडला आहे असे सांगून 2009 नंतरच्या धार्मिक स्थळांवर होत असलेल्या कारवाईचा त्यांनी निषेध केला. कोर्टाचा आडोसा घेऊन सरकार आपली जबाबदारी झटकू पाहत असल्याची टिका देखील त्यांनी केली. या सरकारच्या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत गेल्याची टीका महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांनी केली. नोटाबंदीमुळे बँकातील स्वतःचाच पैसा नागरिकांना संकटकाळीदेखील वापरता आला नाही याची आठवण करून देत नवी मुंबईच्या समस्या या सरकारला सोडवता आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. जाहिरातबाजीवर सरकार करोडो रुपये खर्च करते. मात्र, हाच पैसा शेतकर्यांना मदत म्हणून दिला असता तर त्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या, असे स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील म्हणाल्या. हे सरकार केवळ घोषणा करणारे सरकार असून या घोषणांची पूर्तता त्यांच्याकडून झाली नसल्याचे जिल्हा उपाध्यक्ष इथापे म्हणाले.
सरकारने केलेली नोटाबंदी आणि लादलेल्या जीएसटी टॅक्समुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, अशी टिका करीत डॉ. नाईक यांनी सरकारकडून नवी मुंबईचे स्थानिक प्रश्न सुटले नसल्याचा घणाघात केला. टोलनाके कायम आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या घरांवर कारवाई होतेच आहे. प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद केले आहे. डम्पिंग ग्राउंडला पर्यायी जागा दिलेली नाही. धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू आहे. अशी अनेक उदाहरणे देत डॉ. नाईक यांनी सरकारला जागे करण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन सुरु केल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनीदेखील सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याची खरमरीत टीका केली. सत्तेवर येण्यापूर्वी अब की बार मोदी सरकार असा जोरदार प्रचार करण्यात आला होता. तीन वर्षात जनतेला आपली चूक उमगली असून एक ही भूल कमल का फूल, असे लोक म्हणून लागल्याचा टोला त्यांनी लगावला. नवी मुंबईकरांच्या समस्यांकडे देखील या सरकारने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप सुतार यांनी केला. माजी महापौर सोनावणे यांनी आपल्या खास शैलीत सरकारचा समाचार घेतला.