सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारीच हवी सुट्टी

0

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाची भूमिका

मुंबई :- मुंबईमध्ये वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना रविवार ऐवजी आठवड्यातील अन्य दिवशी सुट्टी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना रविवार ऐवजी आठवड्यातील अन्य दिवशी सुट्टी देणे व्यावहारिकदृष्ट्या उचित ठरणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतली आहे.

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि .कुलथे यांनी सांगितले की, मुंबई हे औद्योगिक शहर आहे. तसेच राज्यातील महत्त्वाची सरकारी कार्यालये आणि सचिवालय येथे आहेत. रविवारी बँकांना सुट्टी असल्याने आर्थिक व्यवहार बंद असतात. तसेच शैक्षणिक संस्थांना रविवारी सुट्टी असल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना भेटतात. त्यामुळे रविवारी सुट्टी नाकारणे सामाजिक कार्यात बाधा आणल्यासारखे असल्याचे कुलथे यांनी सांगितले. वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.सांबरे यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने रविवारऐवजी अन्य दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्यास व्यवस्थेवर पडणारा ताण हलका होईल असे मत व्यक्त केले.

न्यायालयाने केवळ मत व्यक्त केले आहे. याबाबत कोणताही आदेश अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. त्यानुसार राज्याचा विधी आणि न्याय विभाग पुढील कारवाई करेल.
-भगवान साहाय्य
अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग