शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांची टीका
मुंबई : सत्तेत असुनही शिवसेनेला सातत्याने सरकारी कार्यक्रमांमधून डावलण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. यामधून त्यांची संकुचित वृत्ती दिसून येते. प्रोटोकॉलचे कारण भाजप देत असले तरी परदेशातही असे होताना दिसत नाही. नियमांचे पालन करून तेथेही सत्ताधारी आपल्या समविचारी लोकांना मानाचे स्थान देतात. सत्ताधाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे असे प्रकार होत आहेत, अशी टीका सेना प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली.
सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल
शिवसेनेतील माझी 20 वर्षे या गोऱ्हे यांच्या पुस्तकाचे शिवसेना भवन येथे गुरुवारी दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. या कार्यक्रमाची माहिती देत असताना गोऱ्हे यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प भविष्यात राबवला जाईल आणि यासाठी लोकांची मने वळवण्यात येतील, या फडणवीस यांच्या वक्तव्याचा गोऱ्हे यांनी समाचार घेतला. लोकांवर प्रकल्प लादून त्यांची मने वळवता येत नाही. त्यापेक्षा शेतकरी धर्मा पाटील यांचे मन वळवले असते तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, असा टोला गोऱ्हे यांनी मारला.
आधीच्या उद्योग करारांचे काय?
नवीन उद्योग करार झाले पाहिजेत. मात्र आधीच्या दहा वर्षांच्या औद्योगिक करारांचे काय झाले, याचा विचार झाला पाहिजे. यासाठी गेल्या दहा वर्षांतील करारांचा आढावा घ्यायला पाहिजे. यामुळे कागदावर दाखवलेले करार प्रत्यक्षात किती मूर्त स्वरूपात आले आणि त्यामधून केवढे रोजगार निर्माण झाले, हे स्पष्ट होईल, अशी भूमिका गोऱ्हे यांनी मांडली.