सरकार फसवं, शेतकर्‍याला देशोधडीला लावलं!

0

शरद पवार यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद : राज्यात भाजप सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवणूक आहे. केंद्रातील सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची केलेली घोषणादेखील खोटी आहे. उत्पन्न खर्च कमी दाखवायचा आणि नंतर हमीभावही कमीच ठरवायचा, असा सरकारी डाव असून, परिस्थिती अवाक्याबाहेर गेल्यावर पाऊल उचलायचे ही सरकारची नीती आहे. राज्यातील शेती उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत. एकूणच सरकारच्या घोषणा या लबाडा घरचे आवतण आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय हल्लाबोल यात्रेची शनिवारी औरंगाबादेत सांगता झाली. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीरसभेत पवार बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

शेतकरी, उद्योजक देशोधडीला लावला!
भाजप सरकारवर घणाघाती हल्ला चढविताना शरद पवार म्हणाले, सरकारविषयी लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 16 हजार लोकांनी आत्महत्या केल्या. कोणाला दोष द्यावा, मुलाबाळांचा विचार न करता माणूस आत्महत्याच्या मार्गाला जातो. त्याच्या अवाक्याबाहेर परिस्थिती गेल्यावर हे पाऊल उचलले जात आहे. कर्जमाफी ही एक फसवणूक असून आघाडी सरकारच्या काळात 86 हजार कोटींचा कर्जपुरवठा 9 लाख कोटींपर्यंत पोहोचवला. गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने यात फक्त दोन लाखांची वाढ केली आहे. म्हणजे आता कर्जसुद्धा देत नाहीत. सरकार काय देतंय तर, बेरोजगारी, धार्मिक दंगली, असा खोचक टोलाही पवारांनी यावेळी लगाविला. सरकार शेतकर्‍यांना देशोधडीला लावत आहे. शेतकर्‍यांची वीज तोडत आहे. पाणी देत नाही, हे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्यातील महत्त्वाच्या कापसाच्या पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केली नाही. तसेच नोटाबंदीमुळे उद्योगक्षेत्रावरही परिणाम झाला, याला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याची टीकाही पवारांनी केली.

धर्मात हस्तक्षेप नको!
मुस्लीम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तीन तलाकचा कायदा करण्याचा विचार असेल तर मुस्लीम समाजातील धर्मगुरूंना विश्‍वासात घेऊन बदल करायला हवा. तलाक हा कुराणच्या माध्यमातून इस्लाम धर्मात दिलेला संदेश आहे. एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असा हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याची राज्यकर्त्यांना नाही. त्यामुळे समाजातील लोकांना विश्‍वासात घेऊन बदल करायला हवा. मात्र, धर्माला विश्‍वासात न घेता तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असाल आणि एका धर्माच्या लोकांना वेगळ्या ठिकाणी पोचवत असाल. तर आम्ही पाठिंबा देणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

महिलांना पन्नास टक्के आरक्षण द्या!
धार्मिक विषयात सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. होत असेल तर आम्ही त्याला विरोध करू. शरद पवार यांनी सगळ्यांचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षश फौजिया खान यांनी व्यक्त केली. त्यावर समाजाचे मत लक्षात घ्यावे. तिहेरी तलाक बंद केला आहे. मात्र, पुरुषांना तीन वर्षाची शिक्षा याला आमचा विरोध असल्याचे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. महिलांना न्याय द्यायचा असेल तर पन्नास टक्के आरक्षण द्या. शरद पवार यांचा आदर्श घेऊन चाला असे सुळे म्हणाल्या. औरंगाबादमधील इंटरनेट सेवा बंद करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी केला.

शेतकरी आत्महत्येचा देखावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा समारोप शनिवारी औरंगाबादेत झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून 16 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरवात झाली होती. नऊ दिवस ही यात्रा सुरू होती. या नऊ दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सात जिल्ह्यांमधल्या 26 तालुक्यातल्या जनतेशी संवाद साधला. समारोपाच्या रॅलीला विधानपरिषदेतील उपनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. मोर्चाच्या सुरुवातीला शेतकरी आत्महत्येचा देखावा करण्यात आला होता. क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चा पैठणगेट, सिटी चौक, शहागंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला. मोर्चामध्ये महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय होती. त्यासोबतच संपूर्ण मराठवाड्यातून कार्यकर्ते आले होते. मोर्चाच्या पूर्वसंध्येला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभास्थळाची पाहाणी केली होती. मोर्चामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी कोल्हापुरातून संबळकरी आणण्यात आले होते.