जोधपूर : प्रतिनिधी – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाने सोशल मीडियावर अकाऊंट तयार करून त्यावरून चिथावणीखोर पोस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. भागवत सोशल मीडियावर नाहीत तरीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने जोधपूर पोलिसांना दिले.
न्यायालयाने प्रकरण गांभीर्याने घेतले
सरसंघचालकांच्या नावे बनावट अकाऊंट तयार करून त्यावरून अनुसुचित जाती-जमातींबाबत चिथावणीखोर पोस्ट करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे. बनावट अकाउंट तयार करणार्याच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करावा, असे आदेशच जोधपूरच्या एससीएसटी न्यायालयाने पोलिसांनी दिले. सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट करणार्यांविरोधात राजस्थानमधील पाली येथील नरेंद्र कुमार यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. त्यामध्ये मोहन भागवत यांच्यासह अनेकांच्या नावाचा समावेश आहे.
भागवत सोशल मीडियाचा वापर करत नाहीत
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियामुळे माणूस आत्मकेंद्री आणि अहंकारी होतो, असे मत संरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले होते. सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून घेणे गरजेचे असून दुष्परिणामांमुळेच मी सोशल मीडियापासून लांब आहे, असे भागवतांनी म्हटले होते. भागवत हे सोशल मीडियावर सक्रीय नाहीत. मात्र त्यांच्याच नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमुळेच मोहन भागवत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता या सगळ्याला मोहन भागवत यांना उत्तर द्यावे लागणार आहे.