स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांनी सांगितले तेच हिंदुत्व
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी महात्मा गांधी हे कट्टर हिंदू असल्याचा दावा केला आहे. ‘ऑर्गनायझर’ या संघ विचाराच्या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भागवत यांनी हा दावा केला. मागील महिन्यात उत्तरप्रदेशातील मीरतमध्ये झालेल्या राष्ट्रोदय संमेलनामध्ये बोलतानाही भागवत यांनी कट्टर हिंदूचे उदाहरण समजावून सांगत असताना त्यांनी महात्मा गांधींचा दाखला दिला होता. हिंदू हे अधिक कट्टर झाले तरच ते अधिक उदारमतवादी होतात, अशा अर्थाने महात्मा गांधी हे कट्टर हिंदू होते असा दावा भागवत यांनी केला होता. महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांनी जे सांगितले तेच खरे हिंदुत्व आहे, अशी भावनाही यावेळी भागवत यांनी व्यक्त केली. संघाचे हिंदुत्व या सगळ्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे नाही, असेही ते म्हणाले.
हिंदुत्वाकडे तरुणांचे आकर्षण वाढले
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या मुलाखतीमध्ये बोलताना महात्मा गांधी यांच्या ‘हरिजन’ या नियतकालिकामधील लिखानाचा दाखला दिला. आपण सनातनी हिंदू असल्याचे गांधींजी स्पष्ट केले होते, असे भागवत यांनी सांगितले. लढणे किंवा न लढणे हे हिंदुत्व नाही. तर सत्य आणि अहिंसेसाठी जगण्याची आणि मरण्याची तयारी असणे किंवा लढण्याची तयारी असणे हेच खरे हिंदुत्व असल्याचे भागवत म्हणाले. आज हिंदुत्व व संघाकडे मोठ्या प्रमाणात तरूण आकर्षित होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सत्य, अहिंसेवर आपला विश्वास
आज हिंदुत्वाकडे तरूण वळू नये म्हणून हिंदुत्वाची बदनामी केली जाते आहे. तोडून मोडून हिंदुत्वाच्या संकल्पना सांगितल्या जात आहेत. तसेच संघाकडे वळणार्या युवकांना चांगल्याप्रकारे तयार करू, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले, की आपला सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंदांसोबत सुभाषचंद्र बोसांचे हिंदुत्वच खरे आहे असे त्यांनी सांगितले. भागवतांनी याआधीही अशी अनेक विधान केली आहेत. याआधी संघ तीन दिवसात लष्कर तयार करू शकते असे विधानही त्यांनी आपल्या एका भाषणात केले होते.